या अग्रलेखातून एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर आसूड ओढण्यात आले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरही टीका करण्यात आली आहे. घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच दुटप्पी वागत असतील तर अपात्र विधानसभा सदस्यच काय, बाहेरचे सोमेगोमे आत आणून विधिमंडळात कोणतेही ठराव व निवडणूक हे लोक जिंकू शकतात. महाराष्ट्रात असे वर्तन व राजकारण कधीच घडले नव्हते. शिवरायांच्या साक्षीने बाळासाहेब ठाकरे यांच्या शपथा घेऊन हे पाप कोणी करत असेल तर भारतमाता त्यांना माफ करणार नाही. गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपालांच्या टेबलावर प्रलंबित असलेल्या १२ नामनियुक्त आमदारांची फाईल आता लगेच मंजूर होईल. पेढे भरवण्याचा कार्यक्रम पुन:पुन्हा होत राहील, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
‘बंडखोर आमदारांचे चेहरे पडले होते, मनातील पाप त्यांना खात होते’
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा मोठा प्रवास करून शिंदे गटाचे आमदार मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा विमानतळापासून कुलाब्यातील त्यांच्या हॉटेलपर्यंत सुरक्षेसाठी हजारो केंद्रीय जवान दुतर्फा बंदुका घेऊन उभे होते. फक्त हवाई दल व सैन्यच वापरायचे काय ते बाकी होते. कसाबच्या सुरक्षेसाठीही इतके पोलीस नव्हते, पण महाराष्ट्र हा शहीद स्वाभिमानी तुकाराम ओबळेचा आहे, हे शिंदे गटाच्या आमदारांनी विसरू नये. आमदार आले, भगवे फेटे घालून बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळय़ास अभिवादन करून निष्ठेचे नाटक केले, पण या सगळ्यांचे चेहरे साफ पडलेले दिसत होते. त्यांचे पाप त्यांचे मन कुरतडत आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक चैतन्य व ऊर्जेचा सूर्य आहे, हे भगवे फेटेधारी आमदार काजवेही नव्हते. शिवसेनेत असताना काय ते तेज, काय तो रुबाब, काय ती हिंमत, काय तो सन्मान, काय तो स्वाभिमान… असे बरेच काही होते. “कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” असे गर्जले जात होते. तसे काही चित्र आता दिसले नाही. कानटोप्या घालाव्यात तसे भगवे फेटे घालून ‘मावळे’ होता येईल काय?, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.