वृत्तसंस्था, जम्मू ः जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात ढोक गावात ग्रामस्थांनी अतुलनीय धैर्य आणि प्रसंगावधान दाखवून लष्करे तैयबाच्या दोन सशस्त्र दहशतवाद्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या दहशतवाद्यांमध्ये राजोरीमध्ये अलीकडेच झालेल्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार तालिब हुसेन शाह याचाही समावेश असून, तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य असल्याचा आरोप काँग्रेसने केल्याने वाद निर्माण झाला आहे.

तालिब हुसेन शाह व फैजल अहमद दर हे दोन दहशतवादी लपण्यासाठी या गावात आले होते. त्या वेळी ते ग्रामस्थांच्या हाती लागले. या दहशतवाद्यांकडे दोन एके रायफली, सात ग्रेनेड, एक पिस्तूल; तसेच मोठ्या प्रमाणात दारूगोळा मिळाला आहे. त्यांना पकडून देणाऱ्या ग्रामस्थांना नायब राज्यपालांनी पाच लाख रुपयांचा, तर पोलिस महासंचालकांनी दोन लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे.

या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असताना, त्यातील तालिब शहा याची जम्मू काश्मीर भाजप प्रमुख रविंदर रैना यांच्यासोबतची काही छायाचित्रे समाजमाध्यमांवर फिरू लागली. या छायाचित्रांच्या सत्यतेस अधिकृत पुष्टी मिळालेली नसली, तरी त्यामुळे आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. ‘शाह याच्याकडे भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चा आयटी सेलची जबाबदारी देण्यात आली होती,’ असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर, रविंदर रैना यांनी, हे पाकिस्तानचे कटकारस्थान असल्याचे म्हटले आहे. ‘आपण पत्रकार आहोत, असे सांगून शाहने माझ्या मुलाखती घेतल्या होत्या. पक्ष कार्यकर्ते व राज्य मुख्यालयातील नेते यांच्याशी त्याने जवळीक निर्माण केली होती,’ असे रैना यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here