‘…म्हणून भाजपने केला शिवसेना फोडण्याचा प्रयत्न’
एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ३९ आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्याने शिवसेनेचं संघटन खिळखिळं झाल्याचं सांगण्यात येत आहे. या बंडामागे भाजप नेतृत्वाचा हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ‘मुंबई आणि महाराष्ट्रात जोपर्यंत शिवसेना मजबुतीने उभी आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा डाव यशस्वी होणार नाही, हे भाजप नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न आहे. मात्र शिवसेना कागदावर कमजोर दिसत आहे, रस्त्यावर नाही. शिवसैनिक रस्त्यावर उतरेल,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
बंडखोरांवर निशाणा
बंडखोर आमदारांकडून आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असा दावा करत उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं जात आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी बंडखोरांना फटकारलं आहे. ‘तुम्ही फुटून शिवसेनेतून बाहेर गेला आहात, तर मग आपला पक्ष ओरिजिनल कसा आहे? हा प्रश्न बंडखोरांनी स्वत:च्या मनाला विचारायला हवा. कालपर्यंत वाघ असणाऱ्या आमच्या आमदारांना सुरक्षेत फिरावं लागत आहे,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.