मुंबई: शिंदे-फडणवीस सरकार सोमवारी विधानसभेत बहुमत प्रस्तावाला सामोरे गेले. बहुमत प्रस्तावावर मतदान सुरु असताना शिवसेनेकडून पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधण्यात आला. काल विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान सुरु असताना यामिनी जाधव आपला क्रमांक उच्चारण्यासाठी जागेवर उभ्या राहिल्या तेव्हा शिवसेना (Shivsena) आमदारांकडून ‘ईडी-ईडी’चा गजर करण्यात आला होता. आज ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) मतदानासाठी आपल्या जागेवर उभे राहिले तेव्हादेखील शिवसेना आमदारांकडून त्यांना ‘ईडी-ईडी’ चिडवण्यात आले. तेव्हा प्रताप सरनाईक यांनी शांत न राहता तात्काळ शिवसेना आमदारांना प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांच्या दिशेने बघत ‘तुम्हाला अर्ध्या तासात प्रत्युत्तर देतो’ असे म्हटले.

तर दुसरीकडे कालपर्यंत शिवसेनेसोबत असलेले आमदार संतोष बांगरही आज एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत. आज सकाळी संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच विधानभवात आले. बहुमत प्रस्ताव मांडल्यानंतर संतोष बांगर यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले. संतोष बांगर मतदान करण्यासाठी जागेवर उभे राहिले तेव्हा शिवसेनेच्या आमदारांकडून ‘गद्दार-गद्दार’ अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र, त्यावर संतोष बांगर यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देणे पसंत केले.

यामिनी जाधव यादेखील आज पुन्हा मतदानासाठी उभ्या राहिल्या तेव्हा शिवसेना आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली.यामिनी जाधव यांचा अनुक्रमांक येताच आज पुन्हा ‘ईडी-ईडी’ घोषणा देण्यात आल्या. पण आज यामिनी जाधव यांनी हात जोडत सर्वांना उत्तर दिलं. कालही अशीच घोषणाबाजी झाली तेव्हा यामिनी जाधव यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.
पक्ष ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे युक्रेन आहे का; संजय राऊतांनी बंडखोरांना खडसावले

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार मतदानाला गैरहजर

आज बहुमत प्रस्तावावर मतदान झाले तेव्हा सभागृहाच्या प्रथेप्रमाणे सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार उशीरा आल्याने त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. यापैकी काही आमदारांना दरवाजे बंद असल्याने सभागृहाबाहेर ताटकळत उभे राहावे लागले. यामध्ये अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, निलेश लंके, शिरीष चौधरी, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here