मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज विधिमंडळात आपलं बहुमत सिद्ध केलं आहे. सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. ‘एकनाथ शिंदे हे एक वेगळं रसायन आहे. ते कधी झोपतात आणि कधी उठतात तेच कळत नाही. कधी निवडणूक असते, कार्यक्रम असतो, तेव्हा ते २४ तास काम करताना दिसतात. राजकारणात पदं मिळाल्यानंतर माणुसकी अनेकदा आपण हरवतो. पण एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रचंड माणुसकी आहे. प्रत्येकासाठी ते धावून जातात आणि हीच शिकवण दिवंगत आनंद दिघे यांनी त्यांना दिली. ज्याचं कुणी नाही त्याचे दिघे साहेब होते, तीच शिकवण शिंदे यांनाही मिळाली,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करत असताना आपण त्यांना एक सल्ला दिल्याचंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं. ‘एकनाथ शिंदे हे कायम लोकांच्या संपर्कात असतात. आजही रोज ते नित्यनियमाने ४०० ते ५०० लोकांना भेटतात. मी आता एकनाथ शिंदे यांना फक्त एक गोष्ट सांगितली की मुख्यमंत्र्यांनी वेळ पाळली पाहिजे. कारण हा लोकांचा माणूस आहे, लोकांनी घेरलं की त्यांच्या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय ते बाहेर पडत नाहीत. म्हणून मी त्यांना सांगितलं की आता थोडी सुसूत्रता आणा. त्यांनी लगेच त्याची सुरुवातही केली आहे आणि ते नक्कीच यशस्वी मुख्यमंत्री ठरतील,’ असं फडणवीस म्हणाले.

बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘अदृश्य’मदत; उपमुख्यमंत्र्यांनी मानले आभार

‘कमी बोलायचं, पण काम जास्त करायचं हा त्यांचा स्वभाव’

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात ते मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या केलेल्या कामाचा अनुभवही सांगितला. ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस एकदा महापुरात अडकली होती. त्यावेळी पहिलं नाव माझ्यासमोर एकनाथ शिंदे यांचं आलं. मी सांगितल्यानंतर एकनाथ शिंदे तिकडे गेले आणि बोटीत अगदी साप घुसत असताना बोटीत जाऊन प्रवाशांना बाहेर काढलं. यावेळी पत्रकार अडकले होते. पत्रकारांनीही हे सगळं डोळ्यांनी पाहिलं. अधिकारी हिंमत करत नव्हते तिथे शिंदे साहेब गेले. कोल्हापूरमधील पुराच्या वेळीही जीवनावश्यक वस्तू कशा लोकांपर्यंत पोहोचवता येतील याची व्यवस्था त्यांनी केली. कोणाच्या घरातील छोट्यातला छोटा कार्यक्रम असेल तरी वेळ काढून ते जातात. पहाटे चार वाजता का होईना ते जातात, पण जातातच..कमी बोलायचं, पण काम जास्त करायचं हा त्यांचा स्वभाव. शांतपणे ते बसलेले असतात. या संयमामुळेच त्यांची जडणघडण झाली आहे,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here