भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. यावर उत्तर देताना जाधव म्हणाले की, ‘वर्मावर घाव पडतोय म्हणून माझं बोलणं ऐकून घेतलं जात नाही. भाजपने राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? तुम्ही सगळ्यांच्या मागे ईडी लावत आहात. या सगळ्या मराठी माणसांवर ईडी लावत आहात. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे किती लोक तुम्ही पवित्र करून घेतले आहेत. प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, पडळकर, सुजय विखे, प्रसाद लाड, राम कदम, रणजित सिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय गावित, दत्ता मोघे, सत्यजित देशमुख, काशिनाथ पवार, माणिकराव गावित, सुर्यकांता पाटील, प्रताप पाटील चिखलीकर, सुरेश धस, प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, नमिता मुंदडे, वैभव पिचड, कालिदास कोळंबर… किती जणांना धुवून घेणार?’ असा सवाल जाधव यांनी भाजपला विचारला आहे.
सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तुमची कृती सरकार पाडण्यासाठी होती. करोनासारखं संकट आलं, या संकटात सत्ता कोणाची आहे हे विसरुन राज्याला त्यातून बाहेर काढण्याचा आपला इतिहास आहे. पण तुमची कृती सरकार पाडण्याची होती. तुम्ही कधी कुणाच्या हातात भोंगा दिला, तर कधी कुणाच्या हातात हनुमान चालिसा दिली. कधी नुपूर शर्मा, तर कधी सुशांतसिंह महाराष्ट्रात आणला. सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न केला, पण सत्ता उलटली नाही, असंही भाजपला उद्देशून भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.