मुंबई : शिवसेनेतील ३९ आमदारांनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. याच बंडखोर गटाचे नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज विधिमंडळात बहुमतही सिद्ध केलं. या सगळ्या घडामोडींवरून शिवसेना नेतृत्वाकडून बंडखोर आमदारांवर टीका केली जात होती. या टीकेला बंडखोरांच्या वतीने आज विधिमंडळात गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘शिवसेनेचे बंडखोर आमदार माझ्या नजरेला नजर भिडवू शकले नाहीत,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावर एका शेरमधून उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘ नज़र नज़र में उतरना कमाल होता है, नफ़स नफ़स में बिखरना कमाल होता है, बुलंदियों पे पहुँचना कोई कमाल नहीं. बुलंदियों पे ठहरना कमाल होता है.’

‘आदित्य ठाकरे मंत्री असतानाही का फिरले नाहीत’

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही, असा दावा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून केला जात होता. आजच्या भाषणात गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला. ‘आदित्य ठाकरे हेदेखील मंत्री असताना महाराष्ट्रात फिरले नाहीत. एकटे एकनाथ शिंदे महाराष्ट्रात फिरले, जळगावात ते पाच वेळा आले. शरद पवार आज या वयातही राज्यात फिरतात, अजित दादा फिरतात. पण आमचे नेते का नाही आले?’ असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला.

संतापलेल्या भास्कर जाधवांनी भाजपने ‘पावन’ करुन घेतलेल्या ४५ नेत्यांची लिस्टच काढली

बंडखोर गुलाबराव पाटील स्वकियांविरोधातच कडाडले

‘अजित पवार यांचं टार्गेट १०० आमदार निवडून आणण्याचं आहे, बच्चू कडू यांचं १० आमदारांचं आहे. पण आमचं काय? सगळे पक्ष वाढवत आहेत. आमचं घर जळतंय. एक काळ होता, भुजबळ गेले तेव्हा केवढा उठाव झाला. राणे गेले तेव्हा उठाव झाला. पण आज काय झालं? थोडंसं झालं. मतदारसंघात जाऊ तेव्हा पाहा आमची यात्रा. शिवसैनिकांना मान्य असलेला निर्णय घेतला. पाच आमदार गेले ठिक आहे, पण ४० आमदार गेले. पाच टर्मला निवडून आलेले आमदार, मंत्रिपद सोडून आमदार फुटतात. तुम्ही आम्हाला म्हणायला हवं होतं या पाखरांना, चिमण्यांनो. चार लोकांनी आमच्या उद्धव साहेबांवर ही वेळ आणली,’ अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here