काही सदस्यांनी उगाच राणा भीमदेवी थाट चढवून अनावश्यक आक्रस्ताळी भाषणे केली. त्यांची आवश्यकता नव्हती. या उलट, सभागृहाच्या बाहेर आदित्य ठाकरे यांनी पोक्तपणा दाखवून अचानक समोर आलेल्या बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी हस्तांदोलन करून ‘त्या दिवशी आपल्याला एकत्र जेवायचे होते. पण तुम्ही असे कराल असे वाटले नव्हते,’ असे म्हणत नाराजीला वाट दिली पण संवादाचा मार्ग बंद केला नाही. मात्र, सभागृहात ठाकरे गटाचे भास्करराव जाधव यांचा आवेश अतिनाट्यमय होता. एकीकडे, सत्तांतराची आणि विश्वास ठरावाची लगबग चालू असली तरी महाराष्ट्रात पुरेसा पाऊस झालेला नाही आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनीही तातडीने आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी, ही काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांची सूचना अधिक वास्तववादी होती. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतरच्या भाषणात अजित पवार यांनाही ती उचलून धरावी लागली. विधान परिषदेचे मतदान झाले त्या रात्रीपासून महाराष्ट्रातील कारभार जवळपास ठप्प आहे. याला आता दोन आठवडे झाले. पावसाच्या काही बातम्या येत असल्या तरी अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आ वासून उभे आहे. अनेक छोट्या-मोठ्या शहरांचा पाणीपुरवठा कमी करावा लागत आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता होईल, तेव्हा होईल. मात्र, राज्य सरकारने आता किंचितही वेळ दवडू नये. मुख्य म्हणजे, वेळप्रसंगी रात्रभर बसून मंत्र्यांची नावे ठरवावीत आणि त्वरित शपथविधी करून टाकावा. मंत्रिमंडळ कामाला लागायला हवे. झाला हाच विलंब खूप झाला.
मुख्यमंत्र्यांनी जे विस्तृत भाषण केले त्यात बंडाचे कथानक तर होतेच; पण त्या पलीकडचे काही मूलभूत मुद्दे होते. त्यातला एक विचारसरणीचा होता. जुन्या सरकारमध्ये आपल्या हिंदुत्वाची कोंडी होत होती, हे ते स्पष्ट म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उघडपणे ‘आता शंभर आमदार निवडून आणू व आमचा मुख्यमंत्री करू’ असे म्हणत असल्याचा दाखला त्यांनी दिला. याशिवाय, आमदार व सामान्य कार्यकर्त्यांची कामे होत नव्हती, ही बरेच महिने आधी दबक्या आवाजात व नंतर खुलेपणाने होणारी चर्चा त्यांनी सभागृहात थेट मांडली. यातून, सरकार कुणाचेही असले तरी सूडबाजी न होता लोकाभिमुख कारभार कसा व्हायला हवा, हेच सूत्र अधोरेखित होत होते. आता नवे सरकार असे काम करेल का, हा प्रश्न आहे. आज मुख्यमंत्र्यांनी बंडखोरी आणि त्या आधीच्या ‘एकनाथी रामायणा’तील काही अध्याय उलगडले. काही राखून ठेवले. मात्र, त्यांचे दिलखुलास बोलणे जसे महाराष्ट्राला आवडेल; तसेच, अहोरात्र काम करण्याचे आणि थेट आदेश देण्याचे रूपही महाराष्ट्राला पाहायचे आहे. सत्तांतराचे चर्वितचर्वण आता पुरे. ही वेळ सरकार आणि प्रशासनाने जोमाने कामाला भिडण्याची आहे. त्यासाठी विश्वासमत जिंकलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला शुभेच्छा!