बर्मिंगहॅम : चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकानंतरही भारतास इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या क्रिकेट कसोटीत दुसऱ्या डावात २४५ धावांची मजल मारता आली. इंग्लंडने ३७८ धावांचा पाठलाग करताना सोमवारी दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे आजचा पाचवा दिवसाचा खेळ रंगतदार ठरणार आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद २५९ अशी मजल मारली असून त्यांना विजयासाठी ११९ धावांची गरज आहे. दुसरीकडे भारताला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना सात विकेट्स मिळवाव्या लागणार आहेत. भारताच्या मार्गात जो रुट (खेळत आहे ७६) आणि जॉनी बेअरस्टो (खेळत आहे ७२) हे दोन मोठे अडथळे असणार आहेत. कारण चौथ्या दिवशी त्यांनी दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे आता पाचव्या दिवशी नेमकं काय घडतं, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
भारताची आघाडी ४०० धावांच्या आत रोखली असली तरी लक्ष्य सोपे नाही याची इंग्लंडला जाणीव होती. इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या डावात त्यांनी चारपेक्षा जास्त गतीने धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावातही त्यांचा पवित्रा आक्रमकच होता. भारतीय गोलंदाजांना स्थिरावू देण्याची त्यांची योजना बऱ्यापैकी यशस्वी झाली. अॅलेक्स लीस (५६) आणि झॅक क्रॉली (४६) यांनी शतकी सलामी दिल्यानंतर भारताने दोन धावांत तीन फलंदाज बाद केले. मात्र पहिल्या डावातील शतकवीर जॉनी बेअरस्टॉ आणि जो रुट यांनी भारतास केवळ विकेट घेण्यापासूनच रोखले नाही, तर वेगाने धावाही केल्या. चेंडू वळत असतानाही त्यांनी रवींद्र जाडेजाला विकेटपासून रोखत भारतावरील दडपण वाढवले आहे.
भारताचा दुसरा डाव उपाहारानंतरच्या नवव्या षटकांत आटोपला. पहिल्या डावात भारताच्या अखेरच्या पाच विकेटनी इंग्लंडला सतावले होते, पण दुसऱ्या डावात ५ बाद १९८ वरून भारताचा डाव २४५ धावात आटोपला. त्यामुळे इंग्लंडला चारशेपेक्षा जास्त धावांचे लक्ष्य देण्यात भारतास अपयश आले. सकाळच्या सत्रात पुजारा आणि पंत या तिसऱ्या दिवसाच्या नाबाद जोडीने आश्वासक सुरुवात केली होती. पुजाराने अँडरसनला सलग दोन चौकार मारले होते. पहिल्या डावाच्या तुलनेत पंतचा जास्त भर बचावावर होता. हे दोघे मोठी भागीदारी करणार असे वाटत असतानाच ब्रॉडच्या खूपच बाहेरच्या चेंडूला कट करण्याच्या प्रयत्नात पुजारा परतला. काही वेळातच श्रेयस अय्यरला आखूड टप्प्याच्या चेंडूने चकवले. अर्धशतक केल्यानंतर पंतने रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात स्लीपमध्ये झेल दिला. भारताच्या तळाच्या फलंदाजांना इंग्लंडच्या आखूड टप्प्याच्या चेंडूंचा माऱ्यास सामोरे जावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here