shivsena saamana, पुढचे ६ महिने सरकारला धोका नाही, हा केवळ भ्रम; शिवसेनेच्या इशाऱ्याने राजकीय खळबळ – saamana editorial on cm eknath shinde shivsena rebel mlas and bjp devendra fadanvis
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काल बहुमत चाचणी जिंकली. शिवसेना नेतृत्वाला आव्हान देत बाजूला झालेला ४० आमदारांचा गट. भाजप आणि काही अपक्ष अशी एकूण १६४ मते सरकारला मिळाली. मात्र या सत्तास्थापनेनं खवळलेल्या शिवसेनेनं बंडखोरांसह भाजपला इशारा दिला आहे. ‘बहुमत चाचणी जिंकल्यामुळे पुढचे सहा महिने या सरकारला धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील,’ असा दावा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाला इशारा देत असताना शिवसेनेनं राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचाही पुनरुच्चार केला आहे. ‘शिंदे यांच्या फुटीर गटास शुद्ध हेतूने सत्तेवर बसवण्याइतके या मंडळींचे मन मोठे नाही. १०६ आमदारांचा मुख्यमंत्री होत नाही आणि ३९ बंडखोरांचा मात्र मुख्यमंत्री होतो, यात काळंबेरं आहे, असा जो इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला त्याचा गर्भितार्थ शिंदे गटात गेलेल्यांच्या आज लक्षात येणार नाही. कारण त्यांची झापडे बंद आहेत, पण जेव्हा येईल तेव्हा उशीर झालेला असेल. शिवसेनेचा विरोध व महाराष्ट्रद्रोह या सूत्रानुसार शिंदे यांचा जीर्णोद्धार झाला. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे भविष्य अंधकारमय आहे,’ असा दावाही शिवसेनेकडून करण्यात आला आहे. राज्यावर पुढील पाच दिवस आस्मानी संकट; कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
‘हेच फडणवीस यांच्या राजकीय प्रतिष्ठेचे लक्षण समजायचे काय?’
बंडखोर आमदारांच्या गटावर टीका करत असताना शिवसेनेनं भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्रात सत्तांतर घडले त्यात तत्त्व, नैतिकता आणि विचारांचा कोठे लवलेशही दिसत नाही. आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असे भासवून चाळीसेक लोक विधिमंडळातून बाहेर पडतात. पक्षाचा आदेश झुगारून मतदान करतात. न्यायालयाचे आदेश पाळत नाहीत. अशा बेकायदेशीर लोकांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणे व त्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमाकांचे पद स्वीकारून आपल्यापेक्षा कनिष्ठ नेत्याची भलामण करणे हेच फडणवीस यांच्या राजकीय प्रतिष्ठेचे लक्षण समजायचे काय?’ असा खरमरीत सवाल ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ शिवसेनेनंही मध्यावधी निवडणुकांचा अंदाज व्यक्त केल्याने राज्यात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.