मुंबई : पक्षातील बंडखोरीमुळे शिवसेना सध्या ऐतिहासिक संकटात सापडली आहे. शिवसेनेत याआधीही अनेक दिग्गज नेत्यांनी बंड केलं आहे. मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या तब्बल ५५ पैकी ४० म्हणजे दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांनी बंड केल्याने पक्षनेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याद्वारे या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अशातच उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण उद्धव यांचे गेल्या अनेक दशकांपासून विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्याबाबतही सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील उभी फूट पडल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे गेल्या काही दिवसांपासून फारसे सक्रिय नसल्याचं सांगितलं जात आहे. अशातच नुकतीच नार्वेकर यांची एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत विधिमंडळ परिसरात तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेचा तपशील अद्याप समजू शकला नाही. मात्र शिंदे आणि ठाकरेंमध्ये राजकीय घमासान सुरू असताना मिलिंद नार्वेकरांनी श्रीकांत शिंदें यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिंदे सरकारचा झटका; ठाकरेंच्या निकटवर्तीय अधिकाऱ्याची बदली

मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेतील बंड

शिवसेनेत यापूर्वी छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे, गणेश नाईक यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी बंड करून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. यातील बहुतांश नेत्यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर विविध आरोप केले होते. मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे आम्हाला पक्षनेतृत्वाला थेट भेटता येत नाही, असा या नेत्यांचा आरोप होता. मात्र आता त्याच मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत बंडखोरांसोबत संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबतची मैत्री

एकनाथ शिंदे हे गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेत सक्रियपणे काम करत आहेत. त्यांचा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपासून ते ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्यांशीही चांगला संपर्क असल्याचं बोललं जातं. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात असले तरी त्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबतही त्यांची मैत्री आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मिलिंद नार्वेकर हेदेखील उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here