मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडल्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळले होते. एकनाथ शिंदे यांनी अत्यंत नियोजनबद्धरित्या आखणी करून बंडखोर आमदारांना शेवटपर्यंत सुरक्षित ठेवले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतील इतर नेते शेवटपर्यंत बंडखोर आमदारांपर्यंत पोहोचू शकले नव्हते. त्याची परिणती अखेर ठाकरे सरकार कोसळण्यात झाली होती. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एक नवी शक्यता बोलून दाखवली आहे. शिवसेनेतून फुटून बाहेर पडण्यासाठी भाजपने या बंडखोरांना पैशांपेक्षा ‘आणखी काहीतरी’ दिले आहे, असे सूचक वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्टमध्ये’ झालेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

आसाममधील हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांनी लक्झरी लाइफ एन्जॉय केली. त्यासाठी पैसा कोठून आला? या बंडखोर आमदारांना केवळ पैसाच पुरविला गेला नाही तर आणखीही बरेच काही दिले गेले आहे. या सर्व गोष्टी कोठून आल्या?, असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. आणखीही काही म्हणजे काय?, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला. मात्र, ममता बॅनर्जी यांनी त्यावर अधिक बोलणे टाळले. काय नाही, मला काय म्हणायचे आहे ते सर्वांना समजले आहे, अशी मोघम टिप्पणी ममता बॅनर्जी यांनी केली.

तसेच ममता बॅनर्जी यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारवरही टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार हे बेकायदा आहे. त्यांच्या सरकारने सत्ता मिळवली असली तरी महाराष्ट्राचे मन जिंकलेले नाही, असे ममता यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंचा ‘संकटमोचक’ वेगळ्या विचारात? मिलिंद नार्वेकरांची श्रीकांत शिंदेंसोबत चर्चा

‘पुढचे ६ महिने सरकारला धोका नाही, हा केवळ भ्रम’

‘बहुमत चाचणी जिंकल्यामुळे पुढचे सहा महिने या सरकारला धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील,’ असा दावा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आला आहे. ‘शिंदे यांच्या फुटीर गटास शुद्ध हेतूने सत्तेवर बसवण्याइतके या मंडळींचे मन मोठे नाही. १०६ आमदारांचा मुख्यमंत्री होत नाही आणि ३९ बंडखोरांचा मात्र मुख्यमंत्री होतो, यात काळंबेरं आहे, असा जो इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला त्याचा गर्भितार्थ शिंदे गटात गेलेल्यांच्या आज लक्षात येणार नाही. कारण त्यांची झापडे बंद आहेत, पण जेव्हा येईल तेव्हा उशीर झालेला असेल. शिवसेनेचा विरोध व महाराष्ट्रद्रोह या सूत्रानुसार शिंदे यांचा जीर्णोद्धार झाला. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे भविष्य अंधकारमय आहे’, असा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here