‘बांगर यांच्या निष्ठेवर लोकांनी फुले उधळली, पण…’
‘संतोष बांगर हे हिंगोलीचे आमदार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने उभे राहिले व २४ तासांत असे काय घडले की, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हे ‘निष्ठावान’ शिंदे गटाच्या कॅम्पात शिरले. शिवसेनेत राहिल्याबद्दल या निष्ठावान आमदाराचे हिंगोलीत लोकांनी भव्य स्वागत केले. त्यांच्या निष्ठेवर लोकांनी फुले उधळली. आमदार म्हणून विजयी झाले तेव्हाही लोकांनी असे स्वागत केले नव्हते, असे सांगून कपाळास उटी-चंदन लावलेले बांगर रडू लागले. तेच बांगर सोमवारी शिंदे गटात पळून गेले. त्यामुळे विश्वास फक्त पानिपतातच पडला असे नाही, तर प्रत्यक्ष महाराष्ट्रातही अनेक ‘विश्वासराव’ पळून गेले,’ असं म्हणत शिवसेनेनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.
गैरहजर राहिलेल्या काँग्रेस आमदारांचाही समाचार
विधिमंडळात काल घेण्यात आलेल्या बहुमत चाचणीवेळी काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते उशिरा पोहोचल्यामुळे मतदान करू शकले नाहीत. या मुद्द्यावरून शिवसेनेनं काँग्रेसवर निशाणा साधला असून आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘भाजपपुरस्कृत शिंदे गटास १६४ आमदारांनी पाठिंबा दिला व विरोधात ९९ मते पडली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार बहुमत चाचणीच्या वेळेस गैरहजर राहिले. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे ज्येष्ठ मंत्री विधानसभेत पोहोचू शकले नाहीत याचे आश्चर्य वाटते,’ अशा शब्दांत ‘सामना’ अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे.