मुंबई: गेल्या काही तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. सकाळपासून जराही खंड न पडता सातत्याने पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये ‘परंपरेप्रमाणे’ पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असली तरी बच्चेकंपनीची मात्र मजा झाली आहे. कुर्ला भागातही अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून, कुर्ल्यातील नेहरू नगरातील एस.के.पंतवाळवलकर इंग्लिश स्कूलमध्ये पाणी शिरले. या शाळेच्या वर्गांमध्ये पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना घरी सोडण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. पावसामुळे शाळा लवकर सुटल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता. मात्र, या सगळ्यामुळे मोठ्यांची मात्र गैरसोय होताना दिसत आहे. (Heavy Rain in Mumbai)
Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद, NDRF च्या पाच तुकड्या दाखल
पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन आणि रस्ते वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वेच्या सायन आणि माटुंगा रेल्वे स्थानकांत रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरु आहे. तर अंधेरीतील मिलन सबवे पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आहे. आणखी काही तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे सेवा ठप्प होण्याची भीती आहे.

मुंबई, कोकणात तुफान पाऊस

मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. कोकणातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत आहे. या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागांना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबईत एनडीआरएफच्या पाच तुकड्या दाखल

पावसामुळे मुंबईची अवस्था बिकट आहे. सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. अशात हवामान खात्यानेही पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने एनडीआरएफच्या पाच तुकड्या दाखल केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here