Anand dave attack, आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी; केंद्राच्या अलर्टनंतर राऊतांचं पुणे पोलिसांना आवाहन – shivsena leader sanjay raut tweet on anand dave attack and nupur sharma case
मुंबई : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. शर्मा यांना पाठिंबा देणाऱ्या उदयपूर येथील दुकानमालकाची भरदिवसा दुकानात शिरून हत्या करण्यात आली. तसंच देशभरात अशा हिंसक घटना घडत असताना ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय यंत्रणांकडून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुणे पोलिसांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
‘ब्राह्मण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जीवितास धोका असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना कळवलं आहे. उदयपूरप्रमाणे पुण्यात काही घटना घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी,’ अशी मागणी संजय राऊत यांनी ट्वीटमधून केली आहे.
देशभरात अनेक ठिकाणी हिंसा
नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. याच शर्मा यांचं समर्थन केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांचा गळा चिरुन खून करण्यात आला. तसंच उत्तर प्रदेश, झारखंड आणि अन्य काही राज्यांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
नूपूर शर्मा यांनी काही दिवसांपू्र्वी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अनेक देशांनी निषेध नोंदवला होता. संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कुवैत, ओमान, कतार, बाहरीन, जॉर्डन, इराक, लेबनॉन, अफगाणिस्तान, इराण, मालदीव, लिबिया, इंडोनेशियासह किमान पंधरा देशांनी नुपूर शर्मांच्या टिप्पणीचा अधिकृतपणे तीव्र निषेध केला आहे. यापैकी काही देशांमध्ये समाज माध्यमांद्वारे भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते.