लोणावळा : पावसाळा सुरू झाल्याने अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडण्यास सज्ज होत आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात. त्यात मावळ तालुक्यातील लोणावळा हे तर पर्यटनाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. लोणावळ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांची पाऊले लोणावळ्याकडे वळू लागली आहेत. वीकेण्ड असल्याने पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झालं आहे.
मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्यांवर तातडीने कारवाई करणार असल्याचा इशारा लोणावळा शहर पोलिसांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे आणि मुंबई येथून शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. पर्यटकांनी पर्यटनस्थळी येताना काळजी घ्यावी आणि शिस्त पाळावी, असं आवाहन लोणावळा शहर पोलिसांकडून करण्यात आलं आहे .