हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये आणि नजिकच्या शहरांमध्ये पुढच्या ३-४ तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरंतर, कालपासून सुरू असलेला पाऊस अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे आता मुंबईकरांसाठी पुढचे काही तास धोक्याचे आहेत. असंच म्हणावं लागेल.
हायटाईडचा इशारा
दरम्यान, मुंबईत संध्याकाळी ४:१० वाजता चार मीटरपर्यंत हायटाईड होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढच्या मुंबईला ९ जुलैपर्यंत ऑरेंज तर दक्षिण कोकणात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि चाकरमान्यांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्यामुळे मुंबई-ठाण्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि महाराष्ट्रातील इतर अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आढावा बैठक
या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच, पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
मुसळधार पावसाने पुन्हा एकदा मुंबईची दैना…
मुंबईतही दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे. मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. तर लोकल ट्रेनही अपेक्षित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु आहेत. मुसळधार पावसाचा लोकलच्या तिन्ही मार्गांना मोठा फटका बसला आहे. तर अनेक भागांतील रस्ते हे जलमय झालेले पाहायला मिळत आहेत.