एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे फ्रंटफूटवर आहेत. गेल्या चार दिवसांपासून शिवसेना भवनात उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. आजही उद्धव ठाकरे यांनी महिला पदाधिकऱ्यांच्या बैठका घेतल्या. बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिवसैनिकांचा आवाज उद्धव ठाकरे यांच्यासोबत
आदित्य म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं नाही पण शिवसैनिकांचा आवाज ऐकतोय. गेल्या आठवडाभरापासून शिवसैनिकांचा आवाज उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. गेली अडीच वर्ष कोणतीही टीका टिप्पणी केली नाही, नेहमी चांगल्या कामावर बोललो. आताही चांगलंच बोलेन”
कुणाच्याही खास प्रेमाची मला गरज नाही
शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांना वगळून शिवसेनेच्या १५ आमदारांना पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवून त्यांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. यावर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले, “कुणाच्याही खास प्रेमाची मला गरज नाही. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचाच व्हिप हा अधिकृत व्हिप आहे, घटना वाचल्यावर लक्षात येईल”
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणारच
आदित्य ठाकरेंना यावेळी पत्रकारांनी महाराष्ट्रात मध्यावधी लागतील का? असा प्रश्न विचारला. त्यावर सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणारच, ती शक्यता महाराष्ट्रात दिसतीये. तसेच निवडणूक जिंकण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असंही ते म्हणाले.
निवडणुकीला सामोरे जावे, आम्ही आजही तयार आहोत
राहिलेल्या सेना आमदार आणि शिवसैनिकांसोबत मी खंबीरपणे उभा आहे. मी त्यांना बागी विधायक म्हणणार नाही, कारण बगावत करण्यासाठी हिम्मत लागते
जे पळून गेलेत त्यांनी राजीनामा द्यावा, निवडणुकीला सामोरे जावे, आम्ही आजही तयार आहोत, असंही आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.