नागपूर : काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून ठाकरेंचा समाचार घेतला. आम्ही रिक्षावाले असू तर आम्हाला अभिमान आहे, पानटपरी, चहा टपरीवाले असू, रस्त्यावरील विक्रेते असू आम्हाला अभिमान आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत सामान्य माणूसच राजा होईल, हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या लोकांनी समजून घ्यावं, असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चायवाला म्हणून हिणवलं, ज्याला चायवाला म्हणून हिणवलं त्यांच्यावर मोदींना पाणी पिण्याची वेळ आणली, आज त्यांच्या पक्षाची काय अवस्था आहे, हे तुम्ही पाहाताय, आम्ही रिक्षावाले असू तर आम्हाला अभिमान आहे, पान टपरी, चहा टपरीवाले असू, रस्त्यावरील विक्रेते असू आम्हाला अभिमान आहे, कारण या देशात तो स्वाभिमानाने जगतो, मोदींच्या या लाटेत सामान्य माणूसच राजा होईल, हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या लोकांनी समजून घ्यावं. ज्यांना असं वाटतं की तेच सत्ता चालवतील, त्यांनी समजून घ्यावं, असं फडणवीस म्हणाले.

सक्षम विरोधीपक्ष नेता म्हणून महाराष्ट्राचा दौरा करत असताना या सरकारमधील अंतर्गत विरोध रोज दिसत होता, विशेषत: शिवसेनेतील अस्वस्थता दिसत होती, सरकार स्थापन झालं होतं, मंत्री झाले होते, पण लोकांसमोर गेल्यावर काय सांगायचं हा प्रश्न त्यांच्यापुढे होता, शिवसेनेच्या जोरावर इतर पक्ष मजबूत होत होते, हे शिवसेनेचे आमदार, खासदार, नेते कार्यकर्ते पाहात होते, त्यातून शिवसेनेत उठाव झाला, असं देवेंद्र म्हणाले.

हेही वाचा : आमचा देव मातोश्रीच्या मंदिरात हवा होता,शिंदे समर्थक क्षीरसागरांचा थेट उद्धव ठाकरेंवर ‘बाण’?

म्हणून शिवसेनेचाच मुख्यमंत्री

आमच्या पक्षाने हा निर्णय केला, आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही, आम्ही आग्रह धरला असता, तर मुख्यमंत्रिपद मिळालं असतं, ११५ लोकं आमच्यासोबत आहेत, पक्षाने हे सांगितलं की आपल्याला मिळालेलं जनमत हे चोरुन नेलं, म्हणून सत्तेकरता नाही तर विचाराकरता शिवसेनेचाच मुख्यमंत्री करु, असा निर्णय घेतला, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता : उद्धव ठाकरे
पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने शपथ

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय पक्षाने माझ्या संमतीने घेतला, हा प्रस्ताव मी नेला, फक्त त्यावेळी मी बाहेर राहीन हेच ठरलं होतं, ज्यावेळी राज्यपालांना पत्र देऊन पत्रकार परिषद झाली, त्यानंतर पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी मला कॉल केला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन केला, माझी मानसिकता नव्हती, कारण मी बाहेरुन पाठिंबा देण्याच्या भूमिकेत होतो, नंतर मोदींशी चर्चा झाली, त्यांनी सांगितलं की सरकार बाहेर राहून चालत नाही, सरकार चालवायचं असेल तर सरकारमध्ये जायला हवं, वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन करुन निर्णय बदलला आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, यात कुठलाही कमीपणा नाही, असंही फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे माझे सहकारी आहेत, त्यांच्यासोबत मी काम केलंय, माझं संपूर्ण सहकार्य त्यांना असणार आहे, ते मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झालेच पाहिजेत, त्यांच्यात ते गुण आहेत, सर्वात जास्त योगदान मी देणार आहे, आम्ही दोघं मिळून महाराष्ट्राची पटरीवरुन खाली उतरलेली गाडी पुन्हा पटरीवर आणू, महाराष्ट्राला देशातील नंबर एकचं राज्य केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

हेही वाचा : कुणाच्याही खास प्रेमाची गरज नाही, शिंदेंना ठणकावलं तर मध्यावधी लागणारच भाकितही वर्तवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here