जागृती विहार परिसरात एक कुटुंब वास्तव्याला आहे. त्यांचा २२ वर्षीय मुलगा राज (नाव बदलण्यात आलंय) एलएलबीचा विद्यार्थी होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जूनच्या संध्याकाळी ४ वाजता राज स्कूटी घेऊन घरातून निघाला. मात्र तो परत आलाच नाही. याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी राजचा तपास सुरू केला.
पोलिसांनी राजच्या मोबाईलचं लोकेशन तपासलं. शेवटचं लोकेशन मेरठच्या लिसाडी गेट परिसरात आढळून आलं. पोलिसांनी त्याच्या कॉलचा तपशील गोळा केला आणि आलिशान, सलमान आणि शावेज यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी तिघांची चौकशी केली. त्यातून हे प्रकरण समलैंगिक संबंधांचं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. राजनं तीन तरुणांचा एक व्हिडीओ चित्रित केला होता. त्याच्या आधारे तो त्यांना सातत्यानं ब्लॅकमेल करत होता.
ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या आलिशान, सलमान आणि शावेजनं राजला लिसाडी गेट परिसरात पैसे देण्यासाठी बोलावलं. तिघे त्यांचं भांडण झालं. यानंतर शावेज आणि आलिशान यांनी राजची हत्या केली. राजचा मृतदेह त्यांनी सलमानच्या मदतीनं नाल्यात फेकून दिला.
आरोपी शावेज याचा एक कारखाना आहे. आलिशान त्याच कारखान्यात कामाला आहे. तर सलमान त्याचा मित्र असून तो कपड्याचं काम करतो. राज सातत्यानं पैशांसाठी ब्लॅकमेल करत असल्यानं तिघांनी त्याला कारखान्यात बोलावलं. तिथे त्यांच्यात वाद झाला. शावेज आणि आलिशाननं धारदार शस्त्रांनी राजला संपवलं. यानंतर त्यांनी फोन करून सलमानला बोलावलं. तिघांनी रात्र होण्याची वाट पाहिली. राजचा मृतदेह एका गोणीत भरून त्यांनी ती पिलोखडी पूल परिसरात असलेल्या नाल्यात फेकली. या भागात पोलिसांनी शोध घेतल्यानंतर राजचा मृतदेह त्यांच्या हाती लागला.