ज्या दिवशी कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्याच दिवशी औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शहराच्या नामकरणाला विरोध दर्शवित जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू,असा इशारा दिला होता. इम्तियाज जलील यांनी नामकरणाच्या विरोधात असलेल्या विविध पक्ष, संघटना, आणि सामाजिक कार्यकर्त्यांची सुभेदारी विश्रामगृह येथे बैठक बोलावली होती. बैठकीत ‘संभाजीनगर’ नामकरणाला कशा पद्धतीने येत्या काळात विरोध करायचा याबाबत उपस्थितांनी मते मांडली.
यावेळी माध्यमांशी बोलताना जलील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मविआ सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, ‘हा निर्णय संभाजी महाराज यांच्या प्रेमापोटी घेतला नसून सत्ता जात असल्याचं पाहून उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. तर येत्या काळात या निर्णयाविरोधात सर्व जाती धर्मातील लोकांना विश्वासात घेऊन रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढणार आहे’, अशी माहिती इम्तियाज जलील यांनी यावेळी दिली.