जळगाव : जळगाव तालुक्यातील अगदी छोटे गाव म्हणजे ३० ते ४० घरे असलेल्या तिघ्रे या गावात एका घरातून चक्क ८८५ किलो एवढा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. आज मंगळवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखा व नशीराबाद पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून ही कारवाई केली आहे. या गाजांची आजच्या बाजारभावानुसार किंमत ही तब्बल १ कोटी ६ लाख २० हजार रुपये एवढी आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहूल काशिनाथ सुर्यवंशी (वय २५) रा. वाडीशेवाळे ता. पाचोरा या घटनास्थळी मिळून आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर ज्या घरात गांजा सापडला तो घरमालक संशयित फरार आहे. एवढ्या छोट्या गावात एका घरात एवढा मोठा गांजा बघून पोलीस चक्रावले होते.

तिघ्रे गावातील मनोज रोहिदास जाधव याच्या घरात मोठ्या प्रमाणावर गांजा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना कळविले. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार किरणकुमार बकाले यांनी छापा टाकण्यासाठी पथक नियुक्त केलं.

भारताने सामना गमावला, पण तरीही जसप्रीत बुमरा Player Of The Series कसा ठरला, जाणून घ्या
पोलिसांची खबर लागताच काही जण पळाले, एक जण सापडला

स्थानिक गुन्हे अधिकारी कर्मचारी अशा ३० ते ४० जणांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी एकाचवेळी मिळालेल्या माहितीनुसार, तिघ्रे गावातील मनोज जाधव याच्या घरात छापा टाकला. पोलिसांची खबर लागताच या ठिकाणाहून काही जण पळून गेले. तर घटनास्थळी पोलिसांना राहूल काशिनाथ सुर्यवंशी हा तरुण मिळून आला. कारवाईत पोलिसांनी तब्बल ८८५ किलो गांजा जप्त केला आहे. या गांज्याची किंमत आजच्या बाजारभावात १ कोटी ६ लाख २० हजार रूपये आहे. मात्र, घरमालक मनोज जाधव हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

गांजा विक्रीचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता

दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या घरात गांजा सापडला त्या घराचा मालक मनोज जाधव हा चोरीचे मोबाईल विक्रीचे काम करतो. त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा कसा आला? हा मोठा प्रश्न आहे. जिल्ह्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट असावे, या रॅकेटच्या संपर्कात मनोज जाधव आला असावा, तर दुसरीकडे तिघ्रे हे गाव महामार्गालगत आहे. त्यामुळे गांजा उतरविण्यासाठी मनोज जाधव याच्या घराचा वापर केला जात असावा, किंवा याचठिकाणाहून इतर ठिकाणी हा गांजा वितरीत केला जात असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मनोज जाधव यास अटक केल्यानंतर गांजा नेमका आला कुठून, तो कुठे आणि कसा वितरीत होतो, याचा म्होरक्या कोण? असा सर्व प्रश्नांचा उलगडा होणार आहे.

रोज 2GB डेटा, ३० दिवस वैधता आणि अनलिमिटेड कॉल्स, फक्त १५१ रुपयात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here