रत्नागिरी: करोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोकणात संवेदनशील ठरलेल्या रत्नागिरी जिल्हयात प्रशासन आणि नागरिकांनी शिस्तीचे अनोखे दर्शन घडवत करोनामुक्ती मिळवली आहे. रत्नागिरी जिल्हा करोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यातील करोनाचे सर्व रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.

रत्नागिरी जिल्हा करोनामुक्त झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे व आभारही मानले आहेत. जी शिस्त आपण इतके दिवस पाळली ती येणाऱ्या काळातही टिकवूया. पुढील काळातही नागरिकांनी घरात राहून जिल्हा करोनामुक्त राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन परब यांनी केले.

करोनामुक्तीच्या या लढयात सर्व सहभागी यंत्रणा, प्रशासन, पोलीस दल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांचे अधिकारी व सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या कारोना योद्ध्यांचे काम मोलाचे आहे, असे परब यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी व त्यांच्या सर्व यंत्रणेने केलेली कामगिरी मोलाची आहे. या सर्व कालावधीत रत्नागिरी जिल्हयाने जे करुन दाखवले आणि ज्या शिस्तीचे दर्शन घडवले ते आदर्शवत आहे. रत्नागिरीप्रमाणे राज्यातील सर्व जिल्हे करोनामुक्त व्हावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न सुरू आहेत. त्याला निश्चित यश मिळेल, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.

सहा महिन्यांच्या बाळाने केली करोनावर मात

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे सहा रुग्ण आढळले होते. त्यात दुबईतून खेडमध्ये आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अन्य पाच रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात साखरतर भागातील एका सहा महिन्याच्या बाळाचा समावेश होता. बाकी रुग्णांनी करोनाला मात दिल्यानंतर सहा महिन्यांच्या बाळानेही शनिवारी करोनाविरुद्धची लढाई जिंकली. हे बाळ करोनामुक्त झाले. रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमधून या बाळाला आज डिस्चार्ज देण्यात आला. बाळाला घेऊन आई रुग्णालयाबाहेर आली तेव्हा सगळ्यांचेच चेहरे आनंदाने फुलले. टाळ्यांच्या गजरात सर्वांकडून स्वागत करण्यात आले. २० मार्च रोजी रत्नागिरीतील गुहागरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्याला एक महिना आणि पाच दिवस उलटल्यानंतर आज जिल्हा करोनामुक्त झाला. दरम्यान, रत्नागिरीला खेटून असलेला सिंधुदुर्ग जिल्हा आधीच करोनामुक्त झालेला आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here