जवळपास १५ दिवसानंतर बंडखोर आमदारांनी आपापल्या मतदारसंघात काल पाऊल टाकलं. शहाजीबापू पाटील देखील काल सांगोल्यात परतले. त्यांच्या आगमनाचे संपूर्ण सांगोल्यात बॅनर्स लागले होते. अगोदरच विक्रमी ११ वेळा निवडून येणाऱ्या आबांच्या नातवाला पाडून शहाजीबापू निवडून आल्याने त्यांची वेगळीच क्रेज होती. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडात बापूंनी शंभूराजेंसोबत एक पाऊल पुढे टाकलं. गुवाहाटीमधील निसर्ग सौंदर्याचं वर्णन करताना “काय झाडी काय डोंगार हाय हाटील… सगळं एकदम ओक्के मध्ये आहे”, असा माणदेशी झटका त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिला. त्यांचा हाच डायलॉग राज्यात लोकप्रिय झाला. कालही त्यांच्या स्वागतावेळी जमलेल्या लोकांच्या ओठावर “कसं काय सगळं ओक्केमध्ये हाय का नाय…..” असाच सूर होता.
बापूंच्या स्वागतासाठी जसं लोकांनी गर्दी केली होती तसं औक्षण करण्यासाठी त्यांच्या पत्नी रेखाताई पाटील देखील जातीने हजर होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. बापू सगळ्या राज्यात फेमस झालेत तसंच त्यांच्या राज्यमंत्रिपदाची देखील चर्चा सुरु झालीये, याचंही रेखाताईंना अप्रुप वाटत होतं. माध्यमांनी रेखाताईंना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही दिलखुलासपणे माध्यमांशी संवाद साधला.
“२५-३० वर्षांपूर्वी हालाखीची परिस्थिती होती. पण आता बरं चाललंय. बापूंचा डायलॉग प्रसिद्ध झालाय. बापूही राज्यात फेमस झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ओक्के हायती… आता कसली चिंता नाही. सगळं ओक्केमंदी हाय….” अशा भावना रेखाताई पाटील यांनी व्यक्त केल्या. तसेच उपस्थित लोकांच्या आणि मीडियाच्या आग्रहाखातर त्यांनी बापूंचा काय झाडी काय डोंगर हा प्रसिद्ध डायलॉगही म्हटला.
तसेच बापूंच्या नावाचाही त्यांनी उखाणीही घेतला. ‘असेल तिथे मुलीनं नम्रतेनं वागावे, शहाजीबापूसारखे पती मिळाल्यावर देवाजवळ आणखी काय मागावे…’ त्यांचा हा ‘ओक्केमंदी’ घेतलेला उखाणा सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.