Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. आर्वी तालुक्यात दोन दिवसापासून धुवाधार पाऊस बरसत आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळं आर्वीतील कन्नमवार नगरसह अनेक वार्डातील घरात पाणी शिरले आहे. तसेच गावातील रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी आहे. या पावसामुळं शेत शिवारात देखील पाणी साचलं आहे. आर्वी देउरवाडा मार्गावर नाल्यांची साफसफाई केली नसल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साचून देउरवाडा येथील 75 घरात पाणी शिरले आहे.
धान्यासह जीवन उपयोगी साहित्याचं नुकसान
देउरवाडा गावातील रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी आहे. तसेच तेथील 75 घरात पाणी शिरल्यानं पहाटे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. या पाण्यामुळं अनेकांच्या घरातील धान्यासह जीवन उपयोगी साहित्यही भिजल्यानं मोठी नासाडी झाली आहे. नुकत्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या असून अंकुरलेल्या बियाण्यांकडे नजरा असतानाच जोरदार बरसलेल्या पावसाने शेतांचं अक्षरशः तळे बनले आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. संबंधित प्रशासनाला लक्ष देण्याची मागणी केली आहे. आर्वी तळगाव मार्गाचे काम रखडलेले आहे. या पावसामुळे वर्धमनेरी पुलावरुन पाणी गेल्यानं काही काळ वाहतूक ठप्प होती. शिरपूर गावात जाणाऱ्या बाकली पुलावरही पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती.
जून महिन्यात उघडीप दिलेल्या पावसाचा जुलै महिन्यात चांगलाच जोर वाढला आहे. मागच्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि उपनगरासह कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पावसानं हजेरी लावली आहे.
महत्वाच्या बातम्या: