किशोर जोरगेवार यांनी सुरक्षा व्यवस्था नको असल्याचं सविस्तर पत्र लिहिलं आहे. काल त्यांना चंद्रपूर एसपी ऑफिसमधून फोन आला. आपल्याला सरकारकडून Y+ सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय झाला आहे. आपल्यासोबत ६ पोलीस कॉन्स्टेबल असतील, असं पोलिसांनी किशोर जोरगेवार यांना सांगितलं. पण त्यांनी त्याक्षणी Y+ सुरक्षा व्यवस्था नको असल्याचं सांगितलं.
“Y+ सुरक्षा व्यवस्था काय असते याची मी माहिती घेतली. आपण महाराष्ट्रात जिथे जाल तिथे आपल्यासोबत एक शासकीय गाडी आणि एक पोलिसांची गाडी ज्यामध्ये ६ पोलिस हवालदार असतील, असं पोलीस अधिक्षकांनी मला सांगितलं. पण तेव्हाच मी मेल करत मला ही सुरक्षा व्यवस्था नको असल्याचं पोलिसांना कळवलं”, असं जोरगेवार यांनी सांगितलं.
“कारण आम्ही जनतेतून निवडून आलोय. आम्ही जनतेमध्ये राहणारी लोकं आहोत. आम्ही पोलिस सुरक्षेत असल्यावर जनता आमच्यापासून दूर जाऊ शकते. म्हणून आम्हाला सुरक्षा व्यवस्था नको असल्याचं कालच मी पत्र लिहून पोलिसांना कळवलं”, असं किशोर जोरगेवार म्हणाले.
कोण आहेत किशोर जोरगेवार?
- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार
- गेल्या अडीच वर्षापासून महाविकास आघाडीला त्यांनी पाठिंबा दिला होता
- राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत त्यांनी मविआला मतदान केलं होतं
- पण राज्यांत सत्तांतराची चिन्हे दिसताच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला समर्थन दिलं
- सध्या एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारला त्यांनी पाठिंबा देऊ केला आहे