राम शिंदे आणि आशिष शेलार यांचे नाव आघाडीवर
एकनाथ शिंदे गटाच्या साथीने भाजपने राज्याची सत्ता काबीज करण्यात यश मिळवलं असलं तरी २०२४ ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पूर्णवेळ संघटनेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीकडे भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. त्यामुळे पक्षाकडून राम शिंदे आणि आशिष शेलार यांच्या नावावर विचार केला जात आहे. आमदार आशिष शेलार यांनी याआधी भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. शेलार यांच्या कार्यकाळात भाजपने मुंबईत विविध निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे शेलार यांच्या संघटन कौशल्याचा राज्यपातळीवरही पक्षाला फायदा व्हावा, यासाठी त्यांना प्रदेशाध्यपद देण्यात येऊ शकते.
दुसरीकडे, राम शिंदे हेदेखील भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये विजय मिळवणाऱ्या राम शिंदे यांचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र या पराभवानंतरही खचून न जाता त्यांनी जनतेशी असलेली नाळ तोडली नाही. पक्षाने दिलेली गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. राम शिंदे पक्षाशी असलेली एकनिष्ठा आणि योगदान पाहून भाजपा प्रदेश कोअर कमिटी सदस्य म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी पक्षाने त्यांना विधानपरिषदेतही पाठवलं आहे. तसंच शिंदे हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देऊन सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो.
दरम्यान, भाजपकडून अद्याप अधिकृतरित्या प्रदेशाध्यपदाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यपद सोडतात का आणि त्यांनी पद सोडल्यास ही जबाबदारी कोणाकडे देण्यात येते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.