सातारा : एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढावली. तर दुसरीकडे बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. या सर्व घटनाक्रमानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत बंडखोरांचा समाचार घेतला होता. या टीकेमुळे संतापलेल्या बंडखोर सेना आमदारांकडून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला जात असून आता कोरेगाव मतदारसंघातील आमदार महेश शिंदे यांनीही राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
‘संजय राऊत यांच्या रोज सकाळच्या भजन-कीर्तनाचा जनतेलाच कंटाळा आला होता. राऊत यांना शिवसेना संपवायची होती,’ असा घणाघात महेश शिंदे यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आमदारांचं हे प्रकरण प्रेमानं हाताळलं असतं तर जे घडलं तसं घडलंच नसतं, असंही महेश शिंदे यांनी म्हटलं आहे. मोदींपासून दादांपर्यंत सगळ्यांचे फोटो, पण अमित शाह गायब, फडणवीसांच्या मनात काय?
उद्धव ठाकरेंचं कौतुक आणि अजित पवारांवर टीकास्त्र
आमदार महेश शिंदे यांनी बंडखोरीनंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या करोना काळातील कामाचं कौतुक केलं आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून करोनाच्या लाटेत उत्कृष्ठ काम केलं,’ असं ते म्हणाले. उद्धव यांच्यावर स्तुतीसुमने उधळत असताना महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात्र निशाणा साधला आहे.
‘अजित पवारांनी अर्थमंत्री असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला. १५ दिवस राज्यानं जे पाहिलं तो राष्ट्रवादीने शिवसेनेच्या आमदारांना दोन वर्षात दिलेल्या सापत्न वागणुकीचा परिणाम होता. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला,’ असा आरोपही महेश शिंदे यांनी केला आहे.