बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे सातत्याने विविध मंत्रिपदांवर काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक मंत्रिपदाला न्याय दिला. संगमनेर तालुक्याचा व जिल्ह्याचा लौकिक राज्यात वाढेल असं काम केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्री पदाच्या काळात ऑनलाईन सातबारा याचबरोबर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला. सत्तेचा उपयोग हा गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केला आहे. राज्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहोत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरळ व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अनेक वेळा विश्वास टाकला. यातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी मोठे निर्णय घेता आले,’ असंही थोरात म्हणाले.
‘सत्ता येते आणि जाते, पण…’
‘काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना पक्षाला सन्मान मिळून देत महाविकास आघाडी सरकार राज्यात अस्तित्वात आणली. या सरकारच्या काळात करोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी यासारख्या मोठ्या संकटातूनही शेतकऱ्यांना २ लाख रुपये कर्जमाफीसह महाविकास आघाडी सरकारने पायाभूत विकासाचे अत्यंत चांगले निर्णय घेतले. सत्ता येते आणि जाते, पण जनतेची कामे करणे महत्त्वाचे असते. आगामी काळामध्ये प्रगतीपथावर असलेल्या सर्व सहकारी संस्थांची गौरवास्पद वाटचाल अशीच सुरू ठेवून सर्व निवडणुका एकजुटीने एकत्रित लढून मोठे यश संपादन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित रहावे आणि आपल्यामध्ये मनभेद करणारे काही येतील, त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवा. जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढेल आणि जिंकेल याकरता आपण सर्वांनी कटिबद्ध राहावे, असं आवाहनही थोरात यांनी केलं आहे.