एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असं महत्त्वाचं विधान राठोड यांनी केलं. संजय राऊत यांच्यामुळेच आमच्यावर ही वेळ आली. उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मनात आदर आणि प्रेम आहे. मी, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंना समजावलं होतं. त्यांना आमचं म्हणणं पटलंदेखील होतं. आम्हाला भेटण्यासाठी आदित्य ठाकरे सूरतला येणार होते. मात्र त्याचवेळी राऊत फारच विरोधात बोलायला लागले. जहरी टीका करू लागले, असं राठोड यांनी सांगितलं.
मुंबई सोडल्यावर आमचा मुक्काम सूरतमध्ये होता. तेव्हा आमचं पक्ष नेतृत्त्वाशी बोलणं झालं होतं. आम्ही परतण्याची गॅरंटी घेतली होती. पण राऊत फारच विरोधात बोलायला लागले. आदित्य ठाकरे आमच्या भेटीसाठी सूरतला येणार होते. पण अचानक त्यांच्या जागी रविंद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना पाठवण्यात आलं. राऊतांमुळेच आदित्य आणि आमची संभाव्य भेट फिस्कटली, असा आरोप राठोड यांनी केला.
आमदार महेश शिंदे यांचाही राऊतांवर निशाणा
‘संजय राऊत यांच्या रोज सकाळच्या भजन-कीर्तनाचा जनतेलाच कंटाळा आला होता. राऊत यांना शिवसेना संपवायची होती,’ असा घणाघात महेश शिंदे यांनी केला आहे. संजय राऊत यांनी आमदारांचं हे प्रकरण प्रेमानं हाताळलं असतं तर जे घडलं तसं घडलंच नसतं, असं महेश शिंदे यांनी म्हटलं आहे.
आमदार महेश शिंदे यांनी बंडखोरीनंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या करोना काळातील कामाचं कौतुक केलं आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून करोनाच्या लाटेत उत्कृष्ठ काम केलं,’ असं ते म्हणाले. उद्धव यांच्यावर स्तुतीसुमने उधळत असताना महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात्र निशाणा साधला आहे.
‘अजित पवारांनी अर्थमंत्री असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला. १५ दिवस राज्यानं जे पाहिलं तो राष्ट्रवादीने शिवसेनेच्या आमदारांना दोन वर्षात दिलेल्या सापत्न वागणुकीचा परिणाम होता. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा फायदा घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला,’ असा आरोपही महेश शिंदे यांनी केला आहे.