पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहेत. चंदिगढमधील त्यांच्या मुख्यमंत्री निवासात लग्नाची तयारी सुरू झाली आहे. शीख रिती रिवाजांनुसार भगवंत मान आणि गुरप्रीत कौर उद्या लग्न बंधनात अडकतील.

हायलाइट्स:
- पंजाबचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार
- भगवंत मान उद्या बांधणार लगीनगाठ
- डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी करणार लग्न
भगवंत मान यांच्या आई आणि बहिणीनं त्यांच्यासाठी मुलगी पसंत केली. त्यानंतर मान गुरप्रीत यांना भेटले. त्यांना लग्नास होकार दिला. साध्या पद्धतीनं त्यांचा विवाह होईल. गुरप्रीत कौर भगवंत मान यांच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान आहेत. डॉ. गुरप्रीत कौर साधारण कुटुंबातील आहेत. मान आणि गुरप्रीत यांचा विवाह मान पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापूर्वीच निश्चित झाला होता. मात्र पंजाब विधानसभा निवडणुकीमुळे त्यांचा विवाह लांबणीवर पडला.
भगवंत मान ४८ वर्षांचे आहेत, तर गुरप्रीत कौर ३२ वर्षांच्या आहेत. गुरप्रीत कौर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय सामान्य आहे. गुरप्रीत यांना दोन मोठ्या बहिणी आहेत. याआधी अनेकदा गुरप्रीत मान यांच्या घरी दिसल्या आहेत. भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असतानाही त्या उपस्थित होत्या. मात्र चर्चा होऊ नये म्हणून त्या कायम मागे राहिल्या. गेल्या काही दिवसांत कौर अनेकदा मान यांच्या घरी ये-जा करताना दिसल्या.
भगवंत मान आणि गुरप्रीत मान यांच्या लग्नाची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती. गेले काही दिवस मान यांची आई आणि बहिण यांच्यासोबत गुरप्रीत बऱ्याचदा बाजारात खरेदी करताना दिसल्या होत्या. मान आणि गुरप्रीत यांच्या लग्नाला दिल्लाचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.
भगवंत मान २०१४ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. संगरुर मतदारसंघातून ते निवडून आले. तेव्हा त्यांची पत्नी इंद्रजीत कौर यांनी त्यांचा प्रचार केला होता. मात्र २०१५ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. मान यांनी २०१९ मध्येही संगरुरमधून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. २०२२ मध्य आपनं त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं. त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाला घवघवीत यश मिळालं. मान यांनी १६ मार्च २०२२ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network