हितेशने बी.टेक (सिव्हिल) ही पदवी घेतली आहे. शालेय जीवनापासूनच त्याच्यावर भारतीय वायुसेनेचा प्रभाव होता. बारावीनंतर तो एनडीएची परीक्षाही उत्तीर्ण झाला होता. पण मुलाखतीत त्याला अपयश आले मात्र, त्यामुळे खचून न जाता त्याने बी. टेक. पूर्ण केल्यानंतर सीडीएसची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करत आपले ध्येय गाठले. भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून रुजू होणारा हितेश गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव तरूण आहे. त्यामुळे तो सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. हितेश हा चामोर्शी तालुक्यातील मालेर चक येथील प्रतिष्ठित व्यापारी दिवंगत जनार्दन कुकडे यांचा नातू आहे.
चामोर्शी तालुक्यातील मालेर चक या गावात त्याचे वडील मुरलीधर सोनटक्के यांचं मेडिकल स्टोअर आहे. गावात कॉन्व्हेंट स्कूल नसल्याने त्यांनी हितेशला घोट येथील महात्मा गांधी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये टाकले. चौथ्या वर्गापर्यंत तिथे शिक्षण झाल्यानंतर त्याने दहावी आणि बारावीचे शिक्षण नागपूर येथे घेतले. हितेशला इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण होते. त्यामुळे घरच्यांना हितेशकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. जिद्द आणि ध्येय समोर ठेवून बारावीच्या परीक्षेत त्याने अपेक्षित ९७ टक्के गुण प्राप्त करून यशोशिखर गाठले. त्यानंतर पुणे येथील एमआयटी कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली.
यादरम्यान त्याने एनसीसीच्या एअर विंगमधून ‘सी’ सर्टिफिकेट परीक्षा ही उत्तीर्ण केली. स्किट शूटिंगमध्ये तो देशभरातील कॅडेट्समध्ये पहिला आला होता. हितेशने सिडीएस आणि एएफसीएटीची परीक्षा दिली. यामध्ये त्याने भारतातून चौथा व महाराष्ट्रातून पहिला क्रमांक मिळवत भारतीय वायुसेनेत ‘पायलट’ या पदावर नियुक्त झाला. हितेश सोनटक्के गडचिरोली जिल्ह्यातील पहिला पायलट ठरला आहे. हितेश ची पायलट पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.