प्राध्यापक डॉ. ललन कुमार मुझफ्फरपूरच्या नितीश्वर महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. विभागात विद्यार्थीच नसल्यानं त्यांनी ३२ महिन्यांचा पगार परत केला नाही. बिहार विद्यापीठाच्या कुलगुरुंना त्यांनी एक २४ लाखांच्या चेकसह एक पत्र पाठवलं आहे. आपल्याला एलएस, आरडीएस, एमडीडीएम आणि पीजी विभागात बदली करण्यात यावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
मी २५ सप्टेंबर २०१९ मध्ये नितीश्वर महाविद्यालयात कार्यरत आहे, असं ललन कुमार यांनी पत्रात म्हटलं आहे. ‘मला विद्यार्थ्यांना शिकवण्याची इच्छा आहे. मी हिंदी विभागात शिकवतो. विभागात १३१ विद्यार्थी आहे. मात्र त्यातील एकही जण वर्गात बसत नाही. वर्गात विद्यार्थीच नसल्यानं इथे काम करणं माझ्यासाठी शैक्षणिक मृत्यू झाल्यासारखं आहे. इच्छा असूनही मला माझं कर्तव्य बजावता येत नाहीए. अशा परिस्थितीत वेतनाची रक्कम घेणं माझ्यासाठी अनैतिक आहे,’ असं कुमार यांनी पत्रात नमूद केलं आहे.
याआधी मी अनेकदा आंतर महाविद्यालय बदलीसाठी अर्ज केले. मात्र कुलगुरुंनी याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. अशा परिस्थितीत मी माझ्या कामाला न्याय देऊ शकत नाही. माझ्या अंतरात्माचा आवाज ऐकून मी नियुक्तीची तारीख (२५ सप्टेंबर २०१९) ते (मे २०२२) पर्यंतचा २३ लाख ८२ हजार २२८ रुपये इतका पगार विद्यापीठाला परत करत आहे, असं कुमार यांनी पत्रात पुढे म्हटलं आहे.
कुमार यांनी कुलगुरुंसोबतच मुख्यमंत्री (राज्य सरकार) शिक्षणमंत्री, अर्थ विभाग, उच्च न्यायालय (जनहित याचिकेच्या स्वरुपात), विद्यापीठ अनुदान योगदान, शिक्षण मंत्री (केंद्र सरकार), पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि राष्ट्रपती यांनादेखील पत्राची प्रत पाठवली आहे.