ठाणे : शिवसेनेच्या आमदारांसह केलेलं बंड आणि त्यानंतर भाजपच्या मदतीने थेट मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांची सध्या राज्यभरात चांगलीच चर्चा आहे. मात्र आता राज्याचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हे कधीकाळी रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत असत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांकडून ‘रिक्षावाला’ म्हणत टीकेचे बाण सोडले जात आहेत. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आता शिंदे समर्थक रिक्षाचालकांनी ठाण्यात पोस्टर्स लावले आहेत.

ठाण्यातील रिक्षाचालकांकडून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर बॅनर लावण्यात आला आहे. तसंच आज एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ संपूर्ण शहरात हजारोंच्या संख्येने रिक्षा रॅली काढण्यात येणार असल्याचंही यावेळी रिक्षाचालकांकडून सांगण्यात आलं आहे.

जखमी शिवसेनेचा मोर्चा आता मोदींकडे; एकनाथ शिंदेंनाही विचारला खरपूस सवाल

ठाण्यातील एका रिक्षावाल्याने मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला याचा अभिमान असल्याचे दर्शवणारा एक बॅनर ठाण्यातील नौपाडा परिसरातील ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर रिक्षा चालक-मालकांकडून लावण्यात आला आहे. या बॅनरवर ‘होय, आम्हाला अभिमान आहे..आमचा रिक्षाचालक मुख्यमंत्री झाला’ अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.

दरम्यान, आज गुरुवारी हे सर्व रिक्षाचालक एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने रॅली काढणार आहेत. ठाणे महानगरपालिका मुख्यालय प्रवेशद्वारापासून या रॅलीला सुरुवात होणार असून संपूर्ण शहरात ही रॅली जाणार असल्याची माहिती ठाण्याच्या रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विनायक सुर्वे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here