काय असेल नवी योजना?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर दीपक केसरकर म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचा कसा विचार करतात, याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. सध्या मुख्यमंत्र्यांना रिक्षावाला म्हणून हिणवलं जात आहे. माझी काही वेळापूर्वी त्यांच्याशी चर्चा सुरू होती, तेव्हा ते मला म्हणाले की, प्रवासी बसमधून येतात आणि उतरल्यानंतर रिक्षातून आपल्या घरापर्यंत जातात. म्हणजे बस आणि रिक्षा हे एकमेकांशी संबंध असणारे घटक आहेत. बससाठी स्वतंत्र आगार असतं, मात्र रिक्षावाले बाहेर उन्हात असतात. या रिक्षावाल्यांसाठी एसटी आगाराच्या परिसरात तात्पुरता का होईना, काही निवारा करता येईल का, यासाठी एखादी योजना ते तयार करणार आहेत,’ अशी माहिती केसरकर यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगावला टोला
मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना दीपक केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ‘राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिल्यापासूनच त्यांनी आपलं काम सुरू केलं आहे. पहिल्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली होती. त्यानंतर आज ते मुख्यमंत्री कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे हे कार्यालय आता सर्वसामान्यांसाठी खुलं झालं आहे. खूप वर्षांनंतर आता आमदारही या कार्यालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहे. हा आम्हाला आलेला सुखद अनुभव राज्यातील जनतेलाही येईल,’ असं केसरकर म्हणाले.