अहमदनगर : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटल्‍यावरुन कॉंग्रेस कारवाई तरी कोणावर करणार, असा सवाल करतानाच तत्‍व आणि विचारांना तिलांजली देवून, सत्‍तेत सहभागी झाल्‍याबद्दल काँग्रेस नेते पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनीच माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून मध्‍यावधी निवडणुकांची होत असलेली वक्तव्यं ही नैराश्‍याच्‍या भावनेतूनच असल्‍याची प्रतिक्रिया माध्‍यमांशी बोलताना विखे पाटील यांनी दिली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील म्‍हणाले की, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍थापन होणारे सरकार हे विकासाचे आणि विचारांचे आहे. जनतेच्‍या मनातील सरकार सत्‍तेवर आल्‍याने पुढील अडीच वर्षेच काय तर, पुढील अनेक वर्षे हे सरकार जनतेसाठी काम करून आघाडी सरकारच्‍या काळात आधोगतीला गेलेले राज्‍य प्रगतीपथावर आणण्‍यासाठी हे सरकार काम करेल. मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांचा अनुभव आणि त्‍यांची कार्यक्षमता यामुळे राज्‍य निश्चितच पुढे जाईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Eknath Shinde vs Shivsena: ठाण्यात एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचा फक्त एकच नगरसेवक शिल्लक ठेवला, कोण आहे ‘हा’ निष्ठावंत?

‘काँग्रेसमध्ये माणसं तरी किती शिल्लक आहेत?’

विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसची मतं फुटल्‍यामुळे माजी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी पक्षातील आमदारांवरच कारवाई करण्‍याच्‍या केलेल्‍या मागणीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे. ‘कॉंग्रेस पक्ष आता कारवाई तरी कोणावर करणार? कारवाई करायला या पक्षात माणसं तरी किती शिल्‍लक राहिली आहेत? आपल्‍या विचारांना आणि तत्‍वांना तिलांजली देवून कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्‍ये सहभागी झाला होता. धोरणांचा, विचारांचा आणि कार्यकर्त्‍यांचा विचार न करता सत्‍ता भोगल्‍याबद्दल पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनीच माफी मागण्‍याची आवश्‍यकता आहे,’ असं वक्‍तव्‍य विखे यांनी केले.

राज्‍यात शिवसेनेचीही कॉंग्रेसपेक्षा वेगळी परिस्थिती नाही. नेतृत्‍वावर विश्‍वास न राहिल्‍यानेच अनेकजण नेतृत्‍वापासून दूर चालले आहेत. ५५ आमदारांपैकी ४० आमदार एकावेळी निघून जातात. १२ खासदारही त्‍याच विचारात आहेत, आणखी किती माणसे दूर जातील याचा अंदाज शिवसेनेच्‍या नेतृत्‍वाला आता राहिलेला नाही. सत्‍तेसाठी भरकटलेले जहाज यांचे होते. त्‍यामुळेच बेताल वक्‍तव्‍य करणारे प्रवक्‍ते आता पक्षात दिसतील असा खोचक टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.

शिंदे फडणवीसांच्या मध्यरात्री खरंच भेटी व्हायच्या? शंभूराज देसाई म्हणाले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here