नवी दिल्ली: राजकारणात धक्कातंत्राचा अचूकपणे वापर करण्यासाठी प्रसिद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एक नवा डाव खेळला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपने पाठबळ पुरवल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरुद्ध बंडखोरी करून ठाकरे सरकार पाडले होते. त्यानंतर भाजपकडे (BJP) जादा आमदारांचे संख्याबळ असतानाही मोदी-शाह जोडगोळीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. या सगळ्यातून आगामी काळात शिवसेनेला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा डाव मोदी-शाह जोडगोळीने आखला आहे. यादृष्टीने आता मोदी-शाह यांच्याकडून आणखी एक डाव टाकला जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडून सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. (Former MP suresh prabhu may be BJP’s vice president election candidate)

माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुरेश प्रभू यांनी गुरुवारी रात्री दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी प्रभू आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर सुरेश प्रभू यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो ट्विट केला होता. त्यामुळे भाजपकडून सुरेश प्रभू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रभू यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला असून त्यांनी निवडणुकींच्या राजकारणातूनही निवृत्ती घेतली आहे. ते पूर्वी चार वेळा लोकसभेवरही खासदार होते. फेब्रुवारी महिन्यात सुरेश प्रभू यांनी आपण भविष्यात निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यांनी एका अर्थी राजकीय संन्यास घेतला होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुरेश प्रभू हे कोकणातील शिवसेनेच्या महत्त्वाच्या खासदारांपैकी एक होते. परंतु, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सुरेश प्रभू यांना भाजपने राज्यसभेची खासदारकी देऊन त्यांची थेट मंत्रिपदी वर्णी लावली होती. यानंतर सुरेश प्रभू यांनी केंद्र सरकारमध्ये वाणिज्य मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय अशा महत्त्वांच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. रेल्वेमंत्री असताना सुरेश प्रभू यांनी फक्त एका ट्विटवर प्रवाशांच्या समस्येचे निराकरण करण्यास सुरुवात केली होती. रेल्वे मंत्री असताना प्रभू यांनी अनेक सुधारणा केल्या होत्या. अगदी सामान्य प्रवाशांच्या तक्रारीही एका ट्विटवर सुरेश प्रभू यांनी सोडवल्या होत्या. अनेकांनी सुरेश प्रभू यांच्या या कार्यक्षमतेचे कौतुक केले होते. परंतु, नंतर एका रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत सुरेश प्रभू यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी काही काळ वाणिज्य मंत्रालयाचा कारभारही सांभाळला होता. परंतु, मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये सुरेश प्रभू यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. तेव्हापासून सुरेश प्रभू राजकीयदृष्ट्या फारसे सक्रिय नव्हते.
सौम्य आणि संयमी

कोण आहेत सुरेश प्रभू?

सुरेश प्रभू यांनी १९९६ मध्ये तळकोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी प्राध्यापक मधू दंडवते यांचा पराभव केला. यानंतर १९९८, १९९९ या सालच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला. १९९८ साली अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते वने व पर्यावरण खात्याचे मंत्री बनले. खते व रसायन खात्याचा कारभारही त्यांनी सांभाळला. २००४ सालापर्यंत ते मंत्री होते. ऊर्जाखातेही त्यांच्याकडे होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुरेश प्रभू नद्याजोड प्राधिकरणचे अध्यक्ष होते.

त्यानंतर २००९ मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते निलेश राणे यांनी सुरेश प्रभू यांना सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत केले होते. २०१४ मध्ये शिवसेनेने सुरेश प्रभू यांच्याऐवजी विनायक राऊत यांना सिंधुदुर्गातून लोकसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे सुरेश प्रभू शिवसेनेतील संघटनात्मक राजकारणापासून बाजूला गेले होते. हीच संधी हेरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सुरेश प्रभू यांना राज्यसभेची उमेदवारी देत त्यांना भाजपमध्ये आणत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश प्रभू यांच्यावर अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here