मुंबई : मुंबईत आठवडाभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर आज पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पण सध्या थांबलेला हा पाऊस पुन्हा जोरदार कोसणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून पुढच्या २४ तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईला रेड अलर्ट
सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये परिस्थिती अशीच असेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी दिली. शुक्रवारी पालघर, ठाण्यासह मुंबईलाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुससळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही शुक्रवारी रेड अलर्ट आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाट भागात तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल.