Uddhav Thackeray press conference | महाराष्ट्रातील सत्तांतरापूर्वी शिवसेना शरद पवार यांच्या साथीने राष्ट्रपती निवडणुकीत केंद्रातील भाजपसमोर आव्हान उभे करण्याची रणनीती आखत होती. परंतु, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी अनेकजण राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भाषा करु लागले आहेत.

हायलाइट्स:
- कोर्टात आपला पराभव झाल्यास शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह सोडावे लागू शकते
- वेळ पडल्यास वेगळे चिन्ह घेऊन लढायची तयारी ठेवा
- मातोश्रीवरील आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे याबाबत एखादा नवा खुलासा करणार का?
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना अलीकडेच वेळ पडल्यास वेगळे चिन्ह घेऊन लढायची तयारी ठेवा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे न्यायालयीन लढाईत किंवा निवडणूक आयोगाच्या कोर्टात आपला पराभव झाल्यास शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह सोडावे लागू शकते, याची जाणीव उद्धव ठाकरे यांना झाल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांचा एकूण सूर पाहता त्यांनी एकनाथ शिंदे गटाशी सुरु असलेल्या लढाईत शस्त्रे खाली टाकून दिल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे मातोश्रीवरील आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे याबाबत एखादा नवा खुलासा करणार का, हे पाहावे लागेल.
तर दुसरीकडे राष्ट्रपतीपदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरापूर्वी शिवसेना शरद पवार यांच्या साथीने राष्ट्रपती निवडणुकीत केंद्रातील भाजपसमोर आव्हान उभे करण्याची रणनीती आखत होती. परंतु, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी अनेकजण राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भाषा करु लागले आहेत. खासदार राहुल शेवाळे आणि खासदार राजेंद्र गावित या दोघांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्यानिमित्ताने शिवसेनेतील खासदारांचा मोठा गट फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजच्या पत्रकारपरिषदेत काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरेंचा पॅटर्न बदलला
या पत्रकारपरिषदेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी आपला पॅटर्न बदलल्याचे दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यावर भर दिला होता. मात्र, आता शिवसेनेसाठी ‘करो या मरो’, अशी परिस्थिती उद्धवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला पॅटर्न बदलल्याचे दिसत आहे. फेसबुक लाईव्ह ऐवजी उद्धव ठाकरे आता थेट संवाद साधताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर आज ते मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत आहेत. आज दुपारी दोन वाजता https://www.facebook.com/maharashtratimesonline या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ही पत्रकारपरिषद पाहता येईल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network