रतन गुजर व प्रकाश काथार यांना सायबर गुन्हेगारांनी कॉल करुन बँकेमधील अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच तुमचे बँक खाते बंद होणार असल्याची थाप मारून अगोदर विश्वासात घेतले. त्यानंतर केवायसीच्या नावाखाली एनीडेस्क हे रिमोट अॅप मोबाईल मध्ये ईन्स्टॉल करायला लावले. त्यानंतर डेबिट व क्रेडिट कार्डची माहिती घेऊन भाजीविक्रेत्याच्या बँक खात्यातून ऑनलाईन १ लाख ६ हजार रुपये लंपास केले. फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना सर्व घटना सांगितली.
सायबर पोलीस ठाण्यातील कर्मचारी वैभव वाघचौरे व सुशांत शेळके यांनी तात्काळ कार्यवाही करत गुन्हेगारांच्या बँक आणि ई-वॉलेटचा शोध घेऊन संबंधित बँक खाते आणि ई-वॉलेट फ्रिज केले. त्यानंतर फसवणुक करून लंपास झालेली रक्कम १ लाख ६ हजार रुपये संबंधित व्यक्तिला परत मिळवून दिले. भाजी विक्रेता रतन गुजर यांना रक्कम परत मिळताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन सायबर पोलीस टिमच्या कामाचे कौतुक करून पोलीस निरीक्षक पातारे, वैभव वाघचौरे, सुशांत शेळके व संपूर्ण टिमचे आभार मानले. या सर्व प्रकाराचा तपास प्रभारी पोलीस आयुक्त मल्लीकार्जुन प्रसन्ना, पोलीस उपआयुक्त वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक चव्हाण, वैभव वाघचौरे, सुशांत शेळके यांनी केला.