भारत आणि जपान हे दीर्घकाळ परस्परांचे नैसर्गिक मित्र आहेत. या मैत्रीला बौद्ध धर्माचा वारसा, सुभाषबाबूंचे युद्धकारण आणि इतरही कारणे आहेत. या मैत्रीचा वारसा आबे यांनी खूपच पुढे नेला. आधी डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातच ही मैत्री अधिक बहरू लागली. पुढे नरेंद्र मोदी यांच्या काळात तर तिने अनेक नवी शिखरे गाठली. यात या दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत स्नेहसंबंधांचाही मोठा वाटा आहे. ट्रम्प, आबे आणि मोदी यांचे सूर परस्परांशी जुळले होते. आबे यांना ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेरिका या चार प्रमुख देशांची ‘क्वाड’ ही संघटना पुनरुज्जीवित करण्यात जे यश आले, त्यामागेही या व्यक्तिगत स्नेहाचा वाटा होता. हे चार देश उघडच चीनच्या विस्तारवादाला आळा घालण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र, या चारही देशांपैकी आबे यांनी आपला चीनविरोध कधीही लपवला नाही. सारे जग कनवटीला लावण्याच्या चीनच्या आसुरी आकांक्षेला पायबंद घालायचा तर हे चार प्रमुख देश कायम एकत्र राहिले पाहिजेत, हा आबे यांचा आग्रह जगाच्या राजकारणावर पुढची अनेक दशके प्रभाव टाकणार आहे. ही त्यांची कामगिरी कधीही विसरता न येणारी आहे.
आबे यांच्या कार्यकाळात विविध योजनांच्या रूपाने मदतीचा तसेच द्विपक्षीय करारांचा ओघ सुरू झाला, त्यात अर्थातच जपानचे अर्थकारण सावरण्याचा विचार होता. जपानमधील व्याजदर उणे होत असताना देशातील प्रचंड निष्क्रिय भांडवल कुठेतरी गुंतविणे आवश्यक होते. मात्र, हे करताना आबे यांनी भारताला प्राधान्य दिले. भारतात होऊ घातलेली पहिली बुलेट ट्रेन हे अशा सहकार्याचे एक उदाहरण आहे. आबे यांना जपानचे अर्थकारण पूर्ण सावरता आले नाही. मात्र, उत्पादकता वाढविणे, लालफीतशाही कमी करणे, घटती लोकसंख्या हे वरदान समजून कल्पक धोरणे आखणे.. असे सारे उपाय त्यांनी योजले. त्यांच्या कार्यकाळात सन २०१५ ते २०१७ या वर्षांमध्ये जपानने लागोपाठ आठ तिमाहींमध्ये निव्वळ विकास नोंदविला होता. त्याआधीच्या सलग तीन दशकांमध्ये असे कधीही झाले नव्हते. देशांतर्गत धोरणे आणि परराष्ट्र संबंध या दोन्ही आघाड्यांवर सतत यश मिळविणाऱ्या आबे यांनी प्रकृतीचे कारण देऊन सक्रिय राजकारण सोडावे, याचे साऱ्या जगाला नवल वाटले होते. मात्र, फुमिओ किशिदा यांच्याकडे सूत्रे सोपवून आबे राजकारणाच्या धकाधकीतून बाहेर पडले होते. तरीही, सत्ताधारी पक्षाचे ते आधारस्तंभ होते. तो आता निखळला आहे. भारताचा हात हातात घेऊन एकविसाव्या शतकातील नव्या, लोकशाही जगाचे स्वप्न पाहणारा द्रष्टा मित्र आता कायमचा हरपला आहे.