मुंबई : महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेकडून सातत्याने करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त दिल्लीत पोहोचले असतानाच शिवसेनेनं या आरोपाची धार आणखी तीव्र केली आहे. शुक्रवारी दिल्लीत दाखल झालेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सीमाप्रश्नावरून मुख्यमंत्री शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मुख्यमंत्री दिल्लीस निघाले आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडावी इतकेच. त्यांच्या गटाला मंत्रिपदे वाढवून मिळावीत यासाठीच हा दिल्ली दौरा असेल तर काहीच बोलायचे नाही. भाजपच्या ‘हो’ला ‘हो’ केलेत तर मुंबई हातची जाईलच, महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे मनसुबे भाजप तडीस नेईल,’ असा घणाघात शिवसेनेनं आपले मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडखोरीचा राग अद्यापही पक्षनेतृत्वाच्या मनात असल्याचं दिसत आहे. ‘सामना’तून शिंदे यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे. ‘एकनाथ शिंदे हे दिल्लीत शिवसेना फुटीचा, मराठी माणसांच्या एकजूट फोडीचा नजराणाच घेऊन जात असल्याने दिल्लीचे सरकार त्यांना काहीच कमी पडू देणार नाही. तसे वचन पहिल्याच दिवशी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेच आहे. आरेचे जंगल तोडता येणार नाही, ते जंगल म्हणजे मुंबईचे फुप्फुस आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडली तर मुंबईचे लोक व जगभरातील पर्यावरणवादी मुख्यमंत्र्यांचे कौतुकच करतील. शिंदे यांनी वेगळा मार्ग त्यांच्या मर्जीने स्वीकारला असला तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कोणी कौतुक करीत असेल तर ते स्वीकारणारे ‘मन’ आमचे आहे,’ अशी उपरोधिक टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

नाशिकमध्येही शिवसेनेला हादरा बसणार?, राऊतांच्या दौऱ्याकडे लोकप्रतिनिधींची पाठ

‘महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस या दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना?’

महाराष्ट्र-बेळगाव प्रश्नावरून सरकारवर टीका करताना शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खोचक सवाल विचारला आहे. ‘महाराष्ट्राचे तीन तुकडे करून तीन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा विचार दिल्लीच्या मनात आहे व त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असं कर्नाटकातील भाजपचे मंत्री जाहीरपणे बोलतात. त्यावर ना मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ना नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका. महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस या दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना? या शंकेला वाव मिळत आहे,’ असा हल्लाबोल शिवसेनेनं ‘सामना’तून केला आहे.

दरम्यान, शिवसेनेनं केलेल्या या गंभीर आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कशा प्रकारे उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here