सिंधुदुर्ग : शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेचं संघटन खिळखिळं झाल्याचं बोललं जात आहे. या मुद्द्यावरूनच आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘शिवसेनेत उद्भवलेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव जबाबदार आहेत. आज शिवसेनेचे अस्तित्व संपले असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही. या सर्व बाबींना संजय राऊतही जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसून आराम करावा,’ असा टोला राणे यांनी लगावला आहे.

‘उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे आता त्यांनी तोंड गप्प ठेवावं, ज्यांना मुख्यमंत्री असतानाही स्वतःचे आमदार सांभाळता येऊ शकले नाहीत ते मतदार काय सांभाळणार? महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जनतेचे कुठले प्रश्न सोडवले, हे सांगावं. उलट नारायण राणेंच्या घराबाबतीत नोटीस बजावण्याचं काम त्यांनी केलं. अडीच वर्षामध्ये स्वतःच्याच आमदार-खासदारांना ८-८ तास भेटण्यासाठी ते ताटकळत ठेवायचे, त्यांची कामे होत नसायची. केवळ मातोश्रीच्या जवळच्या लोकांचीच कामे करायची,’ असा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.

शिंदे-फडणवीस दिल्लीत पोहोचताच वार करण्यासाठी शिवसेनेकडून हुकमी अस्त्राचा वापर

नितेश राणेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार?

सरकारवर टीका करत असताना नारायण राणे यांनी त्यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही भाष्य केलं आहे. नवीन मंत्रिमंडळामध्ये नितेश राणे यांना संधी असेल का, याबाबत विचारले असता नव्या मंत्रिमंडळाची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला घेऊन गेले आहेत, असं राणे यांनी म्हटलं आहे.

‘सरकार पडणार याची मला आधीच कल्पना होती’

‘मी वेळोवेळी महाविकास आघाडी सरकार कोसळणार, हे सांगत होतो. कारण मला आधीच याची कल्पना होती. आता शिवसेनेच्या चिन्हावरून उभा राहिलेला प्रश्न कायद्याच्या बाबीवर अवलंबून आहे. येत्या ११ तारखेला होणाऱ्या सुनावणीनंतर पुढील हालचाली घडतील. नवीन सरकार जनतेचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबरच हे राज्य लोक कल्याणकारी राज्य बनावे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे,’ असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here