करोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झाल्यानं यंदाच्या आषाढी एकादशी वारीचा उत्सव पुन्हा एकदा उत्साहात साजरा होताना दिसतोय. इतर वारकऱ्यांप्रमाणे आपले लाडके कलाकारही यंदा वारीत आनंदानं सहभागी होताना दिसताहेत. त्यांच्यासाठीही यावर्षीची वारी उत्साहपूर्ण आहे. कलाकार मंडळींनी वारीत सहभागी होऊन वारकऱ्यांची भेट घेतली, त्यांचा उत्साह वाढवला. स्पृहा जोशी, स्वप्निल जोशी, दीप्ती भागवत, प्रथमेश लघाटे, क्षितिश दाते, प्राजक्ता गायकवाड अशा अनेक कलाकारांनी वारीला हजेरी लावली. पंढरपुरात दुमदुणाऱ्या विठ्ठलनामात कलाकारही एकरूप होताना दिसले.
हे वाचा-‘मला तुझ्याकडून काहीच नको’ भरत जाधव विठ्ठलाला असं का म्हणाला?
अभिनेत्री दीप्ती भागवत गेली काही वर्षं विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं वारीत सहभागी होतेय. वारकऱ्यांमध्ये बरेच दिवस घालवल्याचा आनंद तिला अनुभवता येतो. हा संपूर्ण अनुभव ऊर्जा देणारा असतो असं ती आवर्जून सांगते. ‘दोन वर्षांनी वारी पुन्हा एकदा होणार याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अगदी ७ महिन्यांचा छोटासा वारकरी ते ७० वर्षांचे वारकरी आजोबा या सगळ्यांमध्ये मला विठ्ठल दिसला. दिंडीमध्ये डोक्यावर सजवलेली तुळस घेऊन जाणाऱ्या माऊली ते अगदी प्रेमानं अगत्यानं भाकऱ्या वाढणाऱ्या माऊली हे सगळे विलक्षण अनुभव पुढच्या अनेक महिन्यांसाठी सकारात्मक ऊर्जा देत असतात’, असं दीप्तीनं सांगितलं.

हे वाचा-‘मला पांडुरंग भेटला!’ स्वप्निलच्या पायी वारीचे Photo नक्की पाहा
नेहमीच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत काही कलाकारांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारीची वाट धरली. वारीमध्ये सेवा करण्याचा आनंद त्यांनीही घेतला. काहींनी कार्यक्रमानिमित्त तिथे हजेरी लावली तर काहींनी त्यांची कैक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण केली. अभिनेता क्षितिश दाते ‘हरि मुखे म्हणा’ या आषाढी एकादशीनिमित्त असलेल्या कार्यक्रमासाठी वारीत सहभागी झाला आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशीनंदेखील काही दिवसांपूर्वी वारीचा अनुभव घेतला. तिथे तिनं सेवा केल्याचंही सांगितलं. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं काही दिवसांपूर्वी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेला एक फोटो शेअर केला होता. ‘आजवरचा सगळ्यात भारी फोटो’ असंही तिनं त्यात म्हटलं होतं. यावरून तिचं विठ्ठलावरचं, वारीवरचं प्रेम दिसून आलं.
अभिनेता स्वप्निल जोशी देखील पायी वारीचा अनुभव घेत विठू माऊलीच्या भक्तीमध्ये रममाण झाला. वाखरी ते पंढरपूर असा पायी वारीचा प्रवास केल्यानंतर स्वप्निलनं पोस्ट शेअर करत त्याला आलेला अनुभव मांडला आहे.
लोकप्रिय गायक प्रथमेश लघाटेनंदेखील यंदाच्या वारीचा आनंद घेतला. ‘दोन वर्षांनी पुन्हा एकदा वारीत सहभागी होता आलं याचा उत्साह प्रत्येक माऊलीच्या चेहऱ्यावर दिसत होता. वारकऱ्यांबरोबर चालताना त्यांची गाणी ऐकता येतात, त्यांच्यासह गाता येतं, गाण्यातल्या विविध गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात, गायन सेवा करता येते. त्यामुळे वारीचा एकूण अनुभव नेहमीच प्रसन्न करणारा असतो’, असं प्रथमेशनं सांगितलं.
वेळापत्रक कितीही व्यग्र असलं तरी आषाढी एकादशीच्या काही दिवस आधी विठुरायाच्या दर्शनाचे वेध अनेकांना लागतात. काही कलाकारांचंही असंच झालं. पांडुरंगाची सेवा करण्यासाठी, वारकऱ्यांबरोबर वारीचा आनंद लुटण्यासाठी कलाकार मंडळींनी वारीचा अनुभव घेतला.