नाशिक : एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील सभेत बोलताना बंडखोरांवर पुन्हा आक्रमक हल्ला चढवला आहे. ‘शिवसेनेशी बेईमानी करणं सोपं नाही, तुम्हाला ५० खोके पचणार नाहीत. तुम्ही आता शिवसेनेतून गेला आहात ना, मग तिकडे सुखाने राहा आणि आम्ही शिवसेना सोडली हे सांगा. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला हे बंडखोरांनी सांगून टाकावं. शिवसेनेपासून दूर गेल्यानंतर या आमदारांकडून अनेक कारणं सांगितली जात आहेत. मात्र त्यांनी घेतलेले पैशांचे खोके हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. बंडखोरांच्या या खोकेबाजीला आपण ठोकेबाजीने उत्तर देणार आहोत. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा महिला रडत होत्या, महिलांच्या त्या अश्रूंमध्ये गद्दार वाहून जातील,’ असा घणाघात राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना आणि धनुष्यबाण आमचाच असल्याचा दावा केला आहे. शिंदे गटाच्या या दाव्यावरूनही संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘करोना काळात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील नद्यांमध्ये उत्तर प्रदेशप्रमाणे मृतदेह वाहून दिले नाहीत. तुमच्या-आमच्या पोराबाळांचे जीव वाचवले. मात्र मागील चार महिन्यांपासून ते स्वत: गंभीर आजारी होते. त्यांच्या याच आजारपणाचा फायदा घेऊन बंडखोर पक्षातून बाहेर पडले आणि आता आमचीच शिवसेना खरी आणि धनुष्यबाणही आमचाच, असं त्यांचं म्हणणं आहे. अरे धनुष्यबाण आमचा पंचप्राण आहे. आधी या हृदयातून प्राण जाईल आणि नंतरच धनुष्यबाण जाईल. धनुष्यबाण शिवसेनेचाच राहील आणि या महाराष्ट्रात आवाजही शिवसेनेचा राहील,’ असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, मुख्यमंत्र्यांकडून आढावा, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश

‘अख्खा महाराष्ट्र आता फक्त आदेशाची वाट बघतोय’

‘महाराष्ट्रात एकदा अंगार आणि वणवा पेटला तर विझवताना कठीण जाईल, कारण महाराष्ट्र एक तर पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही, हा इतिहास आहे. फक्त नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आदेशाची वाट बघत आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण करण्यात आलं आहे, त्यामुळे संपूर्ण देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. पण अख्खा देश आज आपल्या पाठिशी उभा आहे,’ असंही कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here