तब्बल १४ गावांचा संपर्क तुटला
परभणी जिल्ह्यामध्ये बुधवारपासून पावसाने सर्व दूर हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे तो आज शनिवारी कायमच आहे. त्यामुळे पालम तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत असल्याने १४ गावांचा संपर्क तुटला आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना पालम शहरात जाण्यासाठी पर्याय नसल्याने ते गावातच अडकून पडले आहेत.
सोनपेठ – परळी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद
त्यातच आता सोनपेठ ते परळी मार्गावरील इजेगाव जवळ रस्ता वाहून गेला असल्याने सोनपेठ – परळी मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. परिणामी वाहनधारकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर अनेक वाहनधारक पर्यायी मार्गाने वाहतूक करत असल्याची माहिती मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील बळीराजा मात्र सुखावला आहे. काही शेतकऱ्यांच्या पेरण्या अद्यापही बाकी आहेत त्यामुळे ते शेतकरी पाऊस कधी थांबेल याची वाट बघत आहेत.