असना नदी आणि मेंढला नाल्याच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा सामना करावा लागला आहे. नांदेड ते नागपूर महामार्गावर असलेल्या असना नदीच्या पुलापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे असना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे देखील जिल्ह्याच्या पूर परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
इटनकर यांनी अनेक गावांना देखील भेटी देत तेथील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अर्धापुर तालुक्यातील मेंढला नाल्याला आलेल्या पुरात बामणी या गावात २ जण अडकले होते. गावकरी आणि ‘एनडीआरएफ’ टीमच्या मदतीने या दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस असून पुढील दोन दिवस अजून पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी धोका पत्करून कोणीही नदी, नाले ओलांडून जाऊ नये, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे.