ईडीनं १८ ठिकाणी छापे टाकत तब्बल ३ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ईडीनं हस्तगत केलेल्या नोटांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी पंकज मिश्रा यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर ईडीनं छापे टाकले. खाण घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. मिश्रा यांचे निकटवर्तीय असलेल्या हिरा भगत यांच्या घरावरदेखील छापा टाकण्यात आला. भगत यांच्या घरात ईडीला घबाड सापडलं. बराच वेळ पैशांची मोजदाद सुरू होती.
ईडीनं एकूण ३ कोटींची रोख रक्कम जप्त केल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईवरून भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी ट्विट करून पंकज मिश्रा यांना टोला लगावला. ‘सकाळपासून पत्रकारांनी त्रास दिला आहे. त्यांचीच माहिती सर्वसामान्य जनेतपर्यंत पोहोचवत आहे. पंकज पळू शकला नाही? अखेर ईडीची छापेमारी त्याच्याकडे सुरू झाली. बिचारा वाट पाहत होता, मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधीदेखील आहे’ असा चिमटा दुबेंनी काढला.
आम्ही ईडीच्या चौकशीला घाबरत नाही, असं पंकज मिश्रा माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. आम्ही तयारच होतो. ईडीचे अधिकारी कधी चौकशीला येतात त्याचीच वाट पाहत होतो. मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची माझी तयारी आहे, असं मिश्रा यांनी म्हटलं.