आपल्या परदेश प्रवासाबद्दल पत्नीला काही समजू नये यासाठी तरुणानं परतत असताना पासपोर्टवरील व्हिसा स्टॅम्प असलेली पानं फाडली. आपलं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी तरुणानं ही शक्कल लढवली. मात्र यामुळेच तरुण फसला.

हायलाइट्स:
- पासपोर्टमधील पानं फाडल्यानं अभियंता अडकला
- मालदिव ट्रिप लपवण्याचा प्रयत्न अंगलट
- मालदिवहून आला आणि थेट तुरुंगात पोहोचला
मायदेशी परतत असताना तरुणानं व्हिसाचे शिक्के असलेली पानं फाडली. ही चलाखी तरुणाला महागात पडली. मुंबई विमानतळावर त्याला सुरक्षा रक्षकांनी पकडलं. फाडलेल्या पानांबद्दल सुरक्षा रक्षकांनी विचारणा केली. मात्र तरुणाला समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
मिड डेनं दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणाचं वय ३२ वर्षे असून तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. या अभियंत्यानं कार्यालयीन कामासाठी परदेशी जात असल्याची बतावणी पत्नीकडे केली. त्यानंतर तो त्याच्या प्रेयसीसोबत मालदिवला गेला. प्रेयसीसोबत मालदिवला असताना अभियंत्याच्या पत्नीनं त्याला अनेकदा व्हॉट्स ऍप कॉल केले. मात्र अभियंता पत्नीचे फोन घेत नव्हता.
पती फोन घेत नसल्यानं पत्नीच्या मनाच शंकेची पाल चुकचुकली. तिनं वारंवार कॉल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणानं मालदिवहून लवकर निघण्याचा निर्णय घेतला. मालदिवला गेल्याचा पुरावा पत्नीला सापडू नये यासाठी त्यानं व्हिसाचे शिक्के असलेली पासपोर्टमधील पानं फाडून टाकली. गुरुवारी रात्री अभियंता मुंबई विमानतळावर उतरला.
इमिग्रेशन विभागातील कर्मचाऱ्यांनी अभियंत्याचा पासपोर्ट तपासला. पासपोर्टमधील पान क्रमांक ३ ते ६ आणि ३१ ते ३४ गायब असल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. याबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्याला उत्तरं देता आली नाही. त्यामुळे त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पासपोर्ट प्राधिकरण आणि इमिग्रेशन विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी अभियंत्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस चौकशीत त्यानं मालदिवची सहल आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network