vitthal mandir pandharpur, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा; विठ्ठलनामाच्या गजराने अवघे पंढरपूर दुमदुमले – chief minister eknath shinde and his family performed maha puja at the vitthal temple in pandharpur
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे आज पहाटे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. या पूजेवेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत आणि नातू रुद्रांश अशा चार पिढ्या उपस्थित होत्या. ज्यांच्या चार पिढ्यांकडून एकत्र पूजा व वारी झाली असे एकनाथ शिंदे हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत बीड जिल्ह्यातील गेवराई येथील नवले दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शासकीय महापूजा केली.
राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. त्या विनंतीली निवडणूक आयोगाने परवानगी दिलीय. मात्र तीन अटींसह ती परवानगी देण्यात आली होती. पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये कोणत्याही निधी विकास योजना, कार्यक्रमांची घोषणा करू नये. सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक त्या नियमानुसार परवानग्या घेण्यात याव्यात. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यास हरकत नाही, पण त्या ठिकाणीही उपरोक्त अटींचे पालन करण्यात यावे, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
दरम्यान, शासकीय महापूजा पार पडल्यानंतर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. तसंच सकाळी ११ वाजता सुंदर माझे कार्यालय, स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास हजेरी लावणार आहेत.